मृणाल ठाकूर सध्या तिच्या सन ऑफ सरदार २ या सिनेमामुळे चर्चेत आहे. टीव्हीपासून मृणालने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मृणाल अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसली. तिचा सीता रामम् हा सिनेमा प्रचंड गाजला. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. मात्र आता मृणालचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी केली आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
या व्हिडीओत मृणाल सहकलाकार आणि अभिनेता असलेल्या अरिजीतसोबत दिसत आहे. फिटनेसबद्दल ते दोघेही बोलत आहेत. अरिजीत मृणालला हेडस्टँड आणि पुश अप्सबद्दल सांगत आहे. त्यावर ती म्हणते की "तुला अशा मुलीसोबत लग्न केलं पाहिजे जिचे मसल्स असतील. जा आणि बिपाशासोबत लग्न कर". त्यावर अरिजीत तिला म्हणतो की "ती जर या शोमध्ये असती तर तुला रोलही मिळाला नसता". त्यावर मृणाल म्हणते की "मी तिच्यापेक्षा उत्तम आहे".
मृणालच्या या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. "ती हे खरंच बोलली का? तिच्याबद्दलचा आदर गेला", "बिपाशा तुझ्यापेक्षा हजार पटीने चांगली आहे", "तिच्याबद्दल ही असं का बोलली असेल", "तुझ्यात बिपाशाचा बी पण नाही", अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.