Join us

घरकाम करणाऱ्या मुलीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब, तिचा संघर्ष वाचून डोळ्यांत येईल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 15:48 IST

मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने ती लोकांच्या घरी भांडी घासायची तर तिचे वडील रिक्षा चालवतात.

ठळक मुद्देमान्या ही अतिशय गरीब कुटुंबातील असून तिने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. तिच्या या संघर्षाविषयी तिने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे.

तेलंगणाची मानसा वाराणसी 2020 ची ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ बनली आहे. ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब जिंकणारी मानसा केवळ 23 वर्षांची आहे. हरियाणाची मणिका शोकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह यांना पछाडत मानसाने ‘‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020’चा मुकूट आपल्या नावावर केला. मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे.

मानसाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली असून तिच्या सौंदर्यावर लोक फिदा झाले आहेत. मानसासोबतच मान्या सिंहची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण मान्या ही अतिशय गरीब कुटुंबातील असून तिने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. तिच्या या संघर्षाविषयी तिने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. 

तिने सांगितले आहे की, माझ्या घरची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने कधी कधी आम्हाला खायला देखील मिळायचे नाही. माझे वडील रिक्षा चालवून घर चालवायचे. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे मला माझे शिक्षण देखील पूर्ण करता येत नव्हते. अखेरीस माझ्या आईने तिने दागिने गहाण ठेवून माझे डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मी दिवसा अभ्यास करायचे आणि रात्री लोकांच्या घरी भांडी घासायला जायचे. तसेच मी कॉल सेंटरमध्ये देखील काम केले आहे. माझ्या आई-वडील आणि भावाने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी इतके यश मिळवू शकले. त्यामुळे मी नेहमीच त्यांची आभारी राहीन.

बुधवारी रात्री मुंबईच्या हयात रिजेंसी हॉटेलमध्ये ‘मिस इंडिया 2020’चा फिनाले रंगला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा पूर्णपणे डिजिटल रूपात पार पडली. अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ती खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी या स्पर्धेला हजेरी लावली होती. अपारशक्ती कार्यक्रमाचा होस्ट होता तर पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते तर वाणी स्टार परफॉर्मर होती. 

टॅग्स :मिस इंडिया