- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २४ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे यांचा आज ( २४ ऑक्टोबर) स्मृतिदिन
१ मे १९१९ साली कोलकात्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्याच्या स्कॉटिश चर्च आणि विद्यासागर महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असताना मित्रांच्या मनोरंजनासाठी गाणा-या मन्नांनी नंतर संगीतासाठी स्वत:ला वाहून घेतले. यामध्ये त्यांच्या काकांचा कृष्ण चंद्र डे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. १९५० ते १९७०च्या कालखंडात हिंदी संगीत उद्योगावर राज्य करणारे रफी, किशोर, मुकेश आणि स्वत: मन्ना डे अशा चार महान गायकांच्या श्रेणीतील ते अखेरचे सदस्य होते.
पाच दशकांहून जास्त काळाची संगीत कारकीर्द असलेल्या मन्ना डे यांनी विविध भाषांतील सुमारे ४००० गाणी गायली होती. हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळी, कन्नड आणि आसामी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. ९०च्या दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रातून निवृत्ती घेतली. १९९१मध्ये नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ या चित्रपटामध्ये त्यांनी ‘हमारी ही मुठ्ठी मे’ हे अखेरचे गीत गायले.
ज्या काळात रफी, किशोर आणि मुकेश हे आघाडीच्या अभिनेत्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे आवाज बनले होते, त्या काळात डे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. रवींद्र संगीतावर प्रभुत्व असलेले डे म्हणजे एक बहुआयामी आणि प्रयोगशील गायक होते. त्यांनी पाश्चिमात्त्य आणि कव्वाली यांच्या मिश्रणातून जी गीते निर्माण केली ती अविस्मरणीय ठरली.
१९४३च्या तमन्ना या चित्रपटापासून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे संगीत त्यांचे काका कृष्णचंद्र डे यांचेच होते आणि त्या चित्रपटासाठी त्यांनी सुरैय्या यांच्या सोबत द्वंद्वगीत गायले होते. ‘सूर ना सजे क्या गाऊ मै’ हे त्यांनी गायलेले गीत प्रचंड लोकप्रिय झाले.
१९५०मध्ये मशाल या चित्रपटात मन्ना डे यांना ‘उपर गगन विशाल’ हे सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले गीत एकटय़ाने गाण्याची संधी मिळाली. १९५२मध्ये त्यांनी मराठी व बंगाली या प्रादेशिक भाषांमध्ये एकाच नावाच्या आणि कथेच्या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. तो चित्रपट होता अमर भूपाळी. या चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून त्यांनी एक प्रतिभावंत बंगाली गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मराठी चित्रपटातील त्यांचे ‘अ आ आई, म म मका’ आणि घन घन माला नभी दाटल्या ही गाणी लोकप्रिय झाली.
शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या मन्ना डेंची रागांवर आधारित असलेल्या अतिशय कठीण समजल्या जाणा-या गायनावर कमालीची हुकूमत होती. अशा धाटणीची गाणी ते अगदी सहजतेने गात आणि अशा गाण्यांसाठी संगीतकार नेहमीच त्यांच्याकडे धाव घेत. त्यांच्या या रागांवरील हुकुमतीमुळेच त्यांना स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या समोर पार्श्वगायन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. १९५६च्या बसंत बहार या चित्रपटातील गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित होती. या चित्रपटातील केतकी, गुलाब, जुही हे गीत त्यांना भीमसेन जोशी यांच्या सोबत एक प्रकारची जुगलबंदी स्वरूपात सादर करायचे होते. मात्र, सुरुवातीला नकार दिल्यानंतर त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि भीमसेन जोशींसोबत हे गीत अजरामर केले.
शास्त्रीय संगीतावर असलेले त्यांचे कमालीचे प्रभुत्त्व त्यांच्यासाठी काही प्रमाणात मारक ठरले. त्यांच्या आवाजातील वेगळेपणामुळे कोणाही गायकाला त्यांची नक्कल करता येत नसे. अतिशय ताकदीची गायकी असलेले मन्ना डे कोणतेही गाणे गाण्यापूर्वी त्यासाठी कमालीची तयारी करत. एक गायक म्हणून त्यांच्यात असलेली क्षमता ओळखण्याचे श्रेय मन्ना डे प्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन यांना देत. सुप्रसिद्ध ‘शोमन’ राज कपूर यांचा मुकेश हा आवाज असला तरी त्यांची अनेक लोकप्रिय गीते मन्ना डे यांच्या आवाजात आहेत. राज कपूर यांच्या आवारा, श्री-४२०, चोरी-चोरी या चित्रपटांतील सर्व गीते रसिकांच्या ओठावर आजही कायम आहेत. ये रात भीगी भीगी, आजा सनम मधुर चांदनी मे हम, प्यार हुआ इकरार हुआ ही गाणी त्या काळात तुफान लोकप्रिय झाली होती आणि त्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. मात्र, या सर्वाचे श्रेय शंकरजींना जात असल्याचे मन्ना सांगत. माझ्यामध्ये असलेल्या क्षमतेचा पुरेपुर वापर करून घेण्याचे कसब शंकरजींमध्ये होते. माझ्या आवाजाचा वापर प्रणयगीतांसाठी करण्याचा प्रयोग त्यांनी केला. त्यांनी दिलेल्या संधीमुळेच आपण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलो, असे मन्ना डे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले होते. या संगीतकार जोडीमुळेच त्यांना आघाडीच्या अभिनेत्यांसाठी गाण्याची संधी मिळाली. राज कपूर यांच्या मेरा नाम जोकरमधील ‘ए भाई जरा देख के चलो’ हे गाणे तर त्या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होते.
१९६७च्या उपकारमधील ‘कस्मे वादे प्यार वफा सब बाते है’ हे गीत आणि १९७३च्या जंजीरमधील ‘यारी है इमान मेरा’ हे गीत तर प्राण यांचे खलनायकी चेहरा पुसून टाकण्याच्या त्यांच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले.
मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार यांच्या सोबत त्यांनी अनेक द्वंद्व गीते गायली. एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, शंकर जयकिशन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, अनिल बिस्वास अशा नामवंत संगीत दिग्दर्शकांसोबत काम करताना त्यांनी अनेक गाजलेली गाणी गायली. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
२४ ऑक्टोबर २०१३ साली त्यांचे निधन झाले.