Join us  

'कौन बनेगा करोडपती 14'च्या मंचावर मीराबाई चानूची हजेरी, म्हणाली-देशाने माझ्यावर....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 4:39 PM

कौन बनेगा करोडपती 14 मध्ये मंचावर सुवर्ण पदक विजेती साइखोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (बॉक्सिंग) हजेरी लावली.

अलीकडेच  कौन बनेगा करोडपती 14 मध्ये मंचावर सुवर्ण पदक विजेती साइखोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (बॉक्सिंग) हजेरी लावली. यावेळी त्यांनी  CWG मधील विजयाचा क्षण आणि त्यावेळी इतर सर्व देशांच्या वर आपला तिरंगा फडकताना पाहण्याचा रोमांचक अनुभव सांगितला. सुवर्ण पदक मिळवण्यासाठी पोडियमवर उभे राहिल्यावर कसे वाटले, अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निखत म्हणाली, “माझ्या डोळ्यात आनंदाश्रू साठले होते. माझ्या पाहिल्या-वहिल्या CWG सहभागातच सुवर्ण पदक मिळाल्याचा आनंद मला झाला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सगळ्यांच्या माझ्याविषयीच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्यामुळे, रिंगमध्ये जाऊन उत्कृष्ट परफॉर्म करून माझ्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याकडे माझे लक्ष होते. मी तेच केले आणि मला आनंद वाटतो की, मी माझ्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवू शकले.” मीराबाई चानू म्हणाली, “मला खूपच आनंद झाला होता, कारण टोकियो ऑलिंपिक्सनंतर संपूर्ण देशाने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. ते एक दडपण मनावर होते, कारण टोकियो ऑलिंपिक्सनंतर ही एक मोठी स्पर्धा होती. 2018च्या CWG मध्ये मी सुवर्ण पदक जिंकले होते, तसे यावेळीही ते मिळवण्यासाठी मी कटिबद्ध होते. आपल्या देशाचा झेंडा सर्वात वर फडकत राहावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मला आणखी आनंद कशामुळे झाला असेल, तर तो म्हणजे, स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरले होते आणि ते मला सपोर्ट करत होते. त्यावेळी मला हे जाणवले, की मी भारतासाठी पदक मिळवलेच पाहिजे. जेव्हा मला पदक मिळाले आणि आपला ध्वज सर्वांच्या वर फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा आम्ही सर्व जण अगदी खणखणीत आवाजात राष्ट्रगीत म्हणत होतो. माझ्यासाठी तो एक भावुक करणारा क्षण होता.” 

  निखत झरीन तिने जिंकलेली रक्कम ‘हैदराबाद रनर्स सोसायटी’ला दान करणार तर मीराबाई चानू तिने जिंकलेली रक्कम NEWS (नेटवर्क ऑफ इकॉनॉमी अँड वेल्फेअर सर्व्हिस) ला दान करणार आहे, जी संस्था अंध आणि मूकबधिर मुलांना त्यांची अभ्यासेतर कौशल्ये विकसित करण्यास प्रोत्साहन देते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनमीराबाई चानूराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा