Join us

मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगचे ‘मार्केट’ व्हावे

By admin | Updated: October 23, 2015 03:14 IST

‘स्क्रिप्ट’ हा चित्रपटाचा खरा हिरो असतो असे मानणाऱ्या निर्मात्या संगीता अहिर यांनी मंगलमूर्ती फिल्म प्रॉडक्शनच्या माध्यमातून बॉलिवूडसह मराठी चित्रपट निर्मितीच्या

‘स्क्रिप्ट’ हा चित्रपटाचा खरा हिरो असतो असे मानणाऱ्या निर्मात्या संगीता अहिर यांनी मंगलमूर्ती फिल्म प्रॉडक्शनच्या माध्यमातून बॉलिवूडसह मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘गुड्डू रंगीला, सिंग साहिब द ग्रेट, अपने, लाईफ हो तो ऐसी यांसारख्या हिंदी चित्रपटांसह ‘दगडी चाळ’ द्वारे त्यांनी मराठी निर्मितीमध्ये पाऊल टाकले आहे. एक उत्तम चित्रपट निर्मित करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, निर्मितीमूल्य काय असावीत, असे सांगतानाच मराठी चित्रपटांचे मार्केटिंग होत नाही. त्यामुळे अनेकदा चित्रपट कधी येऊन गेले तेच कळत नाही. यासाठी मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगचे मार्केट तयार होण्याची गरज संगीता अहिर ‘सीएनक्स सेलिब्रिटी रिपोर्टर’ म्हणून व्यक्त करतात. चित्रपट आणि स्ट्रगल हा तसा ठरलेला आहे. माझ्या वाट्याला स्ट्रगल फारसा आलेला नसला तरी एक व्हिजन घेऊन या निर्मिती क्षेत्रात मी पाऊल टाकले. ‘निर्मिती’ हा तसा महिलांचा पिंड. अगदी जन्म देण्यापासून सृजनशीलता, कलात्मकतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्यापर्यंत त्यांचा त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा असतो. त्यामुळे कोणत्याही कलात्मक निर्मितीच्या क्षेत्रात महिलांनीच खऱ्या अर्थाने उतरण्याची गरज आहे. चित्रपट क्षेत्रही त्याला अपवाद ठरत नाही. अगदी चित्रपटाचे कथानक, संगीत किंवा कलात्मकता या गोष्टी तिच उत्तमपणे हाताळू शकते. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. मुळात फिल्म मेकिंग ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. उत्तम चित्रपट होण्यासाठी खूप गोष्टींचे प्लॅनिंग लागते. अगदी तुमचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे? त्यातील क्रिएटिव्ह एक्सपेक्ट, दिग्दर्शक आणि तुम्ही एकमताने चालतात का नाही? चित्रपटाचे बजेट किती आहे, त्याचे मार्केटिंग या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. यशापयशाचीही गणित त्यामध्ये गृहित धरावी लागतात. निर्मिती क्षेत्रापुढची आव्हानेहिंदी - मराठी अशा दोन्ही निर्मिती क्षेत्रामध्ये काम केले असले तरी दोन्हीमध्ये तसा फारसा फरक नाही. फक्त हिंदीचा व्हॉल्यूम जास्त आहे तर मराठीचा कमी, इतकाच काय तो फरक. शासनाकडून निर्मात्यांना सवलती मिळत असल्या तरी प्रश्न आहे चित्रपटगृह उपलब्ध होण्याचा आहे. यातच वृत्तवाहिन्यांवर चांगले मनोरंजन होत असल्याने महागड्या चित्रपटगृहांकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत. पायरसी हा मोठा शत्रू आहेच. फिल्म मेकिंग ही बाब दिवसेंदिवस अधिकच बाब होत आहे. एखाद्या चित्रपटासाठी १०० टक्के रक्कम निर्माता देतो. मात्र त्यातले ५० टक्के शेअर चित्रपटगृह आणि २० ते २५ टक्के शेअर हे डिस्ट्रिब्यूटर घेऊन जातात. यात कमिशन वेगळे असतेच. मग उरल तर निर्मात्यांना मिळते. या सर्व अडीअडीचणी सोडविण्यासंदर्भांत निर्माता असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. मार्केटिंग हा चित्रपटाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. चित्रपट कितीही चांगला झालेला असला तरी तो योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. आज वर्षाला १०० चित्रपट बनत आहेत. पण त्यातले निम्याहून अधिक चित्रपट कधी आले कधी गेले कळत देखील नाही. याला ‘मार्केटिंग’चा अभाव ही गोष्ट कारणीभूत आहे. ‘रिलिज पॅटर्न’ निर्माण होण्याची गरज आहे. आज अनेक निर्मात्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यायचे आहे, पण त्यांना याक्षेत्राविषयी विशेष माहिती नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. यासाठी त्यांना निर्मितीसह मार्केटिंगची माहिती करून द्यायला हवी. मार्केटिंगचे मार्केटही निर्माण करण्याची गरज आहे. यापुढील काळात मंगलमूर्ती फिल्म प्रोडक्शन बरोबरच डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातही उतरणार आहे.