मराठी चित्रपटात हिंदी कलाकार आले की, नेहमीच सोशल साइट, चॅनेल्स व वृत्तपत्रांतून त्यांचे विशेष कौतुक होत असते. तसेच त्यांना स्पेशल ट्रीटमेंटदेखील दिली जाते. पण हीच स्पेशल ट्रीटमेंट आता उलटी झाली आहे. कारण मराठमोळी मुलगी असणारी रीना वळसंगकर-अग्रवाल ही सध्या एजंट राघव या हिंदी मालिकेत दिसत आहे. यामध्ये ती डॉ. आरती मेस्त्रीची भूमिका साकारत आहे. तसेच या मालिकेसोबत अनुप जलोटा व संजना ठाकूर यांच्या कृष्णप्रिया या संगीत नाटकात उदाबाई आणि राधाची भूमिका साकारत आहे.रीनाची ओळख सांगायची म्हणाल, तर आमीर खानचा तलाश चित्रपट आठवतो का? येस, याच चित्रपटामध्ये राणी मुखर्जी व करीना कपूरदेखील दिसल्या होत्या. अशा स्टार टीमसोबत मराठमोळ्या रीनाने एक डॅशिंग महिला पोलीस अधिकारी साकारली होती आणि याच भूमिकेसाठी तिचे विशेष कौतुकदेखील करण्यात आले होते. यामुळे तिचे करिअरदेखील यशस्वी मार्गाने पुढे निघाले आहे. मराठी म्हणाल तर, तिने अजिंठा या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तसेच माझी बायको माझी मेहुणी या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबतदेखील तिने काम केले आहे. अशा प्रकारे हिंदी व मराठी अशा दोन्ही क्षेत्रांत ती यशस्वीरीत्या आपला जम बसवत आहे. यासाठी तिला पुढील कामांसाठी शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत ना?
मराठमोळी रीना चमकतेय हिंदी मालिकेत
By admin | Updated: December 18, 2015 01:30 IST