Join us  

“सगळे फार गलिच्छ होऊन बसलेय, आपल्याकडील लोकशाही अपयशी आहे”; शरद पोंक्षेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 4:44 PM

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत.

Sharad Ponkshe: ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षेसोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेकविध घडामोडींवर ते अगदी स्पष्ट शब्दांत पण थेटपणे भाष्य करत असतात. अलीकडेच शरद पोंक्षे यांनी मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती या पोडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये शरद पोंक्षे यांनी ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. सगळे फार गलिच्छ होऊन बसल्याची खंतही शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. 

शरद पोंक्षे यांनी आपली मुलगी पायलट झाल्याबाबत एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी शरद पोंक्षे यांना ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.  शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. पोस्ट कुठली आहे, काय लिहिले आहे, कशावर काय बोलतो आपण, कशाचा काहीच संबंध नसतो. मग ही गाढवे आहेत असा मी विचार करतो आणि मला त्यांच्याबाबतीत वाईट वाटते. मला डबक्यातल्या बेडकाची गोष्ट आठवते, त्याला वाटतं की हाच समुद्र आहे. अशी त्यांची अवस्था आहे. ते ज्या नेत्यांच्या मागे धावतात, तेही त्यांना तसेच भडकवतात. सगळे फार गलिच्छ होऊन बसलेय म्हणून आपल्याकडची लोकशाही अपयशी आहे, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. 

हा बघ, बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय 

आत्ताचे उदारहरण घ्या. वर्षभरापूर्वी माझी मुलगी पायलट व्हायला अमेरिकेला गेली. विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी माझ्या व्याख्यानामधले काही रील्स मी सातत्याने सोशल मीडियावर टाकत असतो. त्याखाली कमेंट्स असायच्या. हा बघ, बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवले. आता हे बोलताना त्यांना हे माहिती नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते. परदेशात शिकायला जाणे काही पाप नाही. चांगले शिक्षण हवे असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे. आता तर सगळे ग्लोबल झालेय, जग जवळ आलेय, असे शरद पोंक्षे म्हणालेत.

दरम्यान, मी नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळे या २० वर्षांत इतक्या घाणेरड्या पद्धतीने मला ट्रोल केले गेले. इतके घाण-घाण बोलले गेले. मीही सामान्य माणूसच आहे, त्यामुळे सुरुवातीला त्रास व्हायचा. पण नंतर मी ते ओव्हरकम करायला शिकलो. मग विचार करू लागलो की ट्रोल करणाऱ्याची बुद्धीमत्ताच तेवढी आहे, त्याला माहिती नाही शरद पोंक्षे तर तो काय करणार, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :शरद पोंक्षेसेलिब्रिटीसोशल मीडिया