Join us  

'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:15 PM

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ ((Naach ga Ghuma) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्वतःचे करिअर सांभाळून संसार करणारी स्त्री आणि मदत करणारी कामवाली बाई यांची धम्माल गोष्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...

 'नाच गं घुमा' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगा?परेश मोकाशी - कामवाली बाई हीदेखील एक माणूस आहे, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा अशी अपेक्षा आहे, तो आमच्या चित्रपटामुळे नक्कीच बदलेल. कारण प्रत्येकाच्या घरात कामवाली बाई असते. तिचेही एक विश्व असते. तिचे आणि मालकीणबाईंचे एक वेगळे नाते असते. त्यांच्यात भांडणे, वाद, आनंद, सुख-दु:ख असे सर्व काही घडत असते. हे नाते प्रेक्षकांसमोर ‘नाच गं घुमा’ यामधून आम्ही दाखवणार आहोत. 

'नाच गं घुमा' शीर्षक कसं सुचलं? मधुगंधा कुलकर्णी -  'नाच गं घुमा' हे शीर्षक यासाठी कारण प्रत्येक स्त्रीच्या मनात एक काहीतरी स्वप्न असते. पण संसार, मूल, नोकरी, कुटुंबाची काळजी घेणं या रहाटगाडग्यात ते राहून जातं. कारण बाईसाठी तिचं स्वप्न हे प्रायोरिटी लिस्टमध्ये शेवटी असते. तिला समाज सांगत असतो की 'नाच गं घुमा' पण ती म्हणत असते की 'कशी मी नाचू?' या दुष्टचक्रात आपण सगळ्या बायका अडकलेल्या आहोत. आपल्या मनातल्या छोट्या छोट्या इच्छांसाठीही आपल्याला खूप विलंब लागतो. अशाच दोन बायकांची ही गोष्ट आहे ज्यांची स्वप्न रहाटगाडग्यामुळे लांबलेली आहेत. म्हणून मला 'नाच गं घुमा' हे शीर्षक खूप योग्य वाटतं.

तुझा निर्माता म्हणून अनुभव कसा होता?स्वप्निल जोशी - मी आतापर्यंत अभिनेता म्हणून काम करत होतो; पण आता निर्माता म्हणून दुसऱ्या बाजूने काम करतोय. मी दिग्दर्शकाच्या मनातील चित्रपट साकारण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देतोय. कारण दिग्दर्शक हा चित्रपट तयार करतो. त्याला तसे स्वातंत्र्य देणे आवश्यक असते. 

तुला या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?नम्रता संभेराव - मी हास्य जत्रेमध्ये कॉमेडी करत आले आहे, तिथे दहा मिनिटांचे स्कीट असते. त्या कामावरच मला हा चित्रपट मिळाला. खरेतर आज लोकांना हसवणे खूप कठीण झाले आहे. तेच काम या चित्रपटात मी केले आहे. हसवण्यासोबतच यात रडवलेदेखील आहे. कामवाली बाईचे विश्व यात पाहायला मिळणार आहे. 

या सिनेमात काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता?सारंग साठे -  काहीही झालं तरी मला हा सिनेमा करायचाच होता. नट म्हणून मला फार लोक ओळखत नाहीत. काही सिनेमे आल्यानंतर लोकांना हळूहळू कळले. या सिनेमात मी मुक्ताबरोबर काम केले. मी आणि मुक्ता काही वर्षांपूर्वी पुण्यात नाटकात काम करायचो. नंतर आमच्या करिअरच्या दिशा पूर्णपणे वेगळ्या होत्या. मी दिग्दर्शनाकडे वळलो. इतक्या वर्षांनी आता आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केले. मला खूपच मजा आली कारण तिच्याबरोबर माझे जास्तीत जास्त सीन्स होते. तसेच नम्रताबरोबर काम करायला मिळाले. हा सिनेमा म्हणजे माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे असे मी म्हणतो.

टॅग्स :मुक्ता बर्वेस्वप्निल जोशीनम्रता आवटे संभेरावपरेश मोकाशी सुकन्या कुलकर्णी