Join us  

मराठी चित्रपटही होणार ‘बोल्ड’

By admin | Published: January 01, 2016 4:19 AM

आजवर विनोदी, सोशिक अशा टिपिकल विषयांपुरताच मराठी चित्रपट मर्यादित राहिलेला आहे, पण आता ही ओळख दिवसेंदिवस बदलत चालली आहे, असे म्हणावे लागेल.

आजवर विनोदी, सोशिक अशा टिपिकल विषयांपुरताच मराठी चित्रपट मर्यादित राहिलेला आहे, पण आता ही ओळख दिवसेंदिवस बदलत चालली आहे, असे म्हणावे लागेल. कारण आता मराठी चित्रपटाने सामाजिक, विनोदी, सस्पेंस, थ्रिलर या सर्व जॉनर्समध्ये आघाडीवर जाता-जाता बोल्ड चित्रपटांच्या यादीतही आपले नाव कोरायला सुरुवात केली आहे. इतकी वर्षे किसिंग सीन्स वगैरे हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांमध्येच पाहायला मिळत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटातही किसिंग सीन्स हे कथेची गरज म्हणून घेतले जात आहेत. तर काही चित्रपटात कथेची गरज नसतानाही इन्टिमेट सीन्स दाखवण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता हेच पाहा ना, नो एंट्री...पुढे धोका आहे, या चित्रपटात सई ताम्हणकरला बिकनी घातलेली दाखवण्यात आले आहे. हे चित्र मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आणि मराठी प्रेक्षकही आश्चर्यचकित झाला. त्यामुळे मराठी चित्रपट हळूहळू बोल्ड होण्याकडे घोडदौड करत आहेत, असेच म्हटले पाहिजे. त्यात गैर असे काहीच नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की, बॉलीवूडकरांना मराठीची भुरळ पडत असतानाच, मराठी चित्रपटही अजून एक पाऊल पुढे टाकू पाहात आहे. आज सर्वांसाठी जसे नवीन वर्ष सुरू होत आहे, तसेच चित्रपटांसाठीही हे नवीन वर्ष आशा, अपेक्षांनी भरलेले आहे. या नवीन वर्षात तरी चित्रपटात बोल्डचा पडत असलेला हा पायंडा थांबेल आणि त्यापेक्षा नवीन काहीतरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी आशा करूयात. कारण आज वेगळ्या विषयांच्या हाताळणीमुळे मराठी चित्रपटाचे नाव मोठे झाले आहे. यापुढील काळात त्याची वेगळी ओळख निर्माण होऊ नये म्हणजे झाले. मराठीत आलेल्या बोल्ड सीन्सबद्दल सीएनएक्सने घेतलेला आढावा...जोगवा : जोगतिणींच्या आयुष्यावर तयार केलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रथमच किसिंग सीन दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता उपेंद्र लिमयेला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर या चित्रपटाने मोहोर उमटवली होती. टाइम प्लीज : छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या आणि खऱ्या आयुष्यातही जोडीदार झालेल्या अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी ‘टाइम प्लीज’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात या दोघांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकावर आधारित हा चित्रपट २०१३ मध्ये तयार क रण्यात आला होता. एका जनरेशनची गॅप असलेल्या नवरा-बायकोतील नाते प्रेम, भांडण या वळणांवरून मैत्रीचे तयार होते.दुभंग, अनवट : आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानिटकर या रीअल लाइफ पार्टनर्सनी ‘दुभंग’ चित्रपटामध्ये बोल्ड साँग केले होते. इतकेच नाही, तर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनवट’ या चित्रपटात या दोघांचा किसिंग सीन दाखवण्यात आला होता. गजेंद्र अहिरेंनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर दुभंग चित्रपट महेश कोठारेंनी स्वत: दिग्दर्शित केला होता. हे दोन्ही चित्रपट विशेष चालले नाहीत, पण या बोल्ड सीन्समुळे चित्रपटांची बरीच चर्चा झाली होती.परतु : खऱ्या घटनेवर आधारित ‘परतु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन अडसूळ यांनी केले होते. राजस्थानमधून मुंबई पाहायला आलेला मुलगा परतीच्या प्रवासाला निघालेला असताना हरवतो आणि नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला सापडतो. तिथेच तो वाढतो, त्याचे लग्न होते आणि नंतर त्याच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध लागतो. या वेळी ‘जीव पिसाटला’ गाण्यामध्ये सौरभ गोखले आणि गायत्री सोहम यांचे लग्नानंतरच्या दिवसांतील बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत.जबरदस्त : पुष्कर जोग आणि मानसी नाईक असलेल्या ‘जबरदस्त’ या चित्रपटाचे महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गाण्यामध्ये किसिंग सीन दाखवला होता. मात्र, तो पूर्णपणे न दाखवता, त्याची आयडिया येईपर्यंतच किसिंग सीनचे दृश्य दाखवले होते.