Join us  

येत्या शुक्रवारी ‘नगरसेवक’ आपल्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 1:05 PM

अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठया समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीयपटांची मोठी परंपरा आहे. राजकारण ...

अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठया समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीयपटांची मोठी परंपरा आहे. राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो.तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच धर्तीवर ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक एक नायक’ हा आगामी मराठी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम यांनी केलंय. या चित्रपटात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या 'मल्हार' या तरुणाची कथा पहायला मिळणार आहे.या मल्हारची भूमिका उपेंद्र लिमये यांनी साकारली आहे.मुंबईत नव्याने दाखल झालेल्या मल्हारचा अनपेक्षितपणे राजकारण्यांशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. राजकारण म्हणजे फक्त समाजकारण किंवा सत्ताकारण नव्हे तर नीती-अनीतीचा बुरुज मोडून रचलेला एक हुशार खेळ आहे. यात समाजाचे हित जोपासणारा टिकला पाहिजे आणि अशा राजकारणाची पहिली पायरी असते, ती म्हणजे नगरसेवक. एकमेकातील डाव- प्रतिडाव याचं वास्तववादी चित्रण ‘नगरसेवक’ चित्रपटातून घडणार आहे.‘नगरसेवक’ चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे व अभिजित कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद त्यांच्यासोबत योगेश मार्कंडे यांनी लिहिलेत.त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर तर कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केले आहे. यातील चार वेगळ्या शैलीतील गीते गीतकार बिपीन धायगुडे, अभिजित कुलकर्णी व विनायक येरापाल्ले यांनी लिहिली असून ती संगीतकार देव आशिष यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला व बेला शेंडे यांनी यातील प्रेमगीत गायले असून आनंद शिंदे व आदर्श शिंदे यांनी हळदी गीत गायले आहेत.शीर्षक गीत कविता निकम, राजा हसन व देव चौहान यांनी गायले असून कविता निकम व देव चौहान यांच्या आवाजात आयटम साँगही ऐकायला मिळणार आहे.येत्या शुक्रवारी ‘नगरसेवक’ रसिकांच्या भेटीला येतोय.