Join us  

लेखक-दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांचे चरणदास चोर या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 8:43 AM

क्योंकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, ...

क्योंकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलीकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी ‘चरणदास चोर’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. १९९४ पासून ते २०१४ पर्यंत सतत टेलिव्हीजन डेली सोप केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी क्रिकेटपटू महेन्द्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी–द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी संशोधन आणि पटकथा लेखनात साहाय्य केले. ‘के’ सिरीजसह गेली वीस वर्षं टीव्ही मालिका आणि एम. एस. धोनी सारख्या सुपरहिट चित्रपटाचे लेखन केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन तसेच निर्मिती करणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हिंदी टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये लेखन-दिग्दर्शन केलेल्या श्याम माहेश्वरी यांचा ‘चरणदास चोर’ हा चित्रपट २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या निर्मिती संस्थेच्या ‘दर्द’ या मालिकेपासून साहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्याम माहेश्वरी यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास वीस वर्षं टीव्ही मालिकेच्या लेखन-दिग्दर्शनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सिनेदिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षं साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. दिग्दर्शनासोबत लेखनात हातखंडा असलेल्या श्याम माहेश्वरी यांना नीरज पांडे यांनी एम. एस. धोनी चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सोपवली आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. अनुभव सिन्हांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडून शिकलेले तंत्र आणि ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या सिनेमाचा प्रभाव...या अनुभवातून ‘चरणदास चोर’ ही कलाकृती घडली आहे.चरण चंद्रकांत मोरे या साध्या आणि गरीब स्वभावाच्या चाकरमान्याची ही गोष्ट आहे. अनावधानाने त्याच्याकडून एक चोरी होते. चोरी साधीसुधी नाही तर तब्बल दोन कोटी रुपयांची होते. दोनशे रुपये खर्च करण्याची अक्कल नसलेल्या चरण मोरेचा चोरी केल्यानंतरचा रोलर कोस्टर प्रवास अत्यंत मार्मिक, खुमासदार विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे. बऱ्याच काळानंतर सात्विक आणि सकस विनोद ‘चरणदास चोर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी चरणदास चोर महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.Also Read : चित्रपटाच्या शुटींगचे दोन कोटी रूपये घेऊन स्पॉटबॉय पसार