Join us

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नक्कीच काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:50 IST

  प्रियांका लोंढे        बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. अंगावर शहारे येतील ...

  प्रियांका लोंढे        बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. अंगावर शहारे येतील असे डायलॉग... काळजाला भिडणारी गाणी आणि तडफदार कलाकारांचा समावेश असणाºया या चित्रपटातून शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी अभिनेता जितेंद्र जोशीने लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा दिलखुलास संवाद...  बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाकडे राजकारण म्हणुन पाहिले जात आहे, त्यामुळे सिनेमाला अडचणी येऊ शकतात किंवा पुढे विरोध होऊ शकतो असे वाटतेय का ?-: नाही मला असे बिलकुलच वाटत नाही. कारण आम्हाला सत्ताधारी  पक्षातीलच अनेकांनी असे सांगितले आहे की, गड किल्लांचे संवर्धन हे झालेच पाहीजे. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा परिणार आहे कि नाही हे मला माहित नाही, पण औरंगाबाद मधील तीन किल्ल्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक हे नक्कीच घडतय असे मला वाटते.  लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, तो अनुभव कसा होता?-: लंडनमध्ये आम्ही या सिनेमाचे अगदी चार दिवसात शूटिंग संपवले होते. आमचा अनुभव तर खुपच छान होता. शूटिंगच्या दरम्यान तिथे एक किस्सा घडला. आम्हाला तिथल्या एका म्युझिअम मध्ये चोरी झाल्याचा सीन चित्रीत करायचा होता. त्यासाठी आम्ही परवानगी घेतली. पण जेव्हा तो सीन शूट करण्याची वेळ आली आणि पोलिसांची गाडी यासाठी आम्हाला मागवायची होती तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितले की इथे अशा प्रकारचा प्रसंग घडूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला असा सीन शूट करता येणार नाही.  या चित्रपटाचा लेखक हेमंत ढोमे आहे, एक स्वतंत्र दिग्दर्शक म्हणुन त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे तुमचा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता?-: या चित्रपटाचा विषयच असा होता कि आम्ही सर्वांनी अगदी झापाटून काम केले आहे. आणि ती स्फुर्ती आणि एनर्जी आम्हाला हेमंतमुळेच मिळाली आहे. तुम्ही जर आमची टिम पाहीली तर पर्ण पेठे अगदी छोट्या रोलसाठी देखील काम करायला तयार झाली कारण या सिनेमाचा विषयच भिडणारा होता. संगीतकार अमितराज, आदर्श शिंदे, आमचा कॅमेरामन मिलींद जोग, कॉश्च्युमसाठी कल्याणी कुलकर्णी आली. आणि आमच्या या टिमने अगदी पॅशनेटली काम केले आहे. त्यामुळे हेमंत सोबत आणि या संपूर्ण टिमसोबतच काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव मला मिळाला. आज कोणताही चित्रपट करताना कॉमर्सचा विचार केला जातोच, याविषयी तु काय सांगशील?-: कॉमर्सचा विचार करायलाच पाहीजे. तुम्ही हे विसरुच शकत नाही कि कोणतेही काम करण्यासाठी पैसे लागतातच. आता चित्रपटाची पटकथा लिहायची असेल तर कागद पेन तरी लागेलच ना. बोटातून काही शाई येत नाही. कागद आणण्यासाठी तरी तुमच्याकडे पैसे पाहीजेत ना. कॉमर्स शिवाय काय चालणार हे पण लक्षात घ्यायला हवे.   सेलिबिटींनी त्यांच्या सेलिब्रिटीहूडचा वापर सामाजिक कार्यासाठी करावा का, याविषयी तुला काय वाटते?-: नक्कीच कलाकारांनी सामाजिक कार्यासाठी पुढे यावे असे मला वाटते. आणि आपल्याकडे तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाहाल तर या गोष्टीची सुरुवात फार पूर्वी झाली आहे. डॉ.श्रीराम लागू , निळु फुले या कलाकारांनी बरेच सामाजिक काम केले आहे. पण त्यावेळी या सर्व गोष्टींना ग्लॅमर नव्हते. आणि हे कलाकार कधी त्याविषयी बोलतही नसायचे. या चित्रपटाच्या निमित्ताने तर मी एवढे सांगतो की, माझ्या सेलिब्रिटीहूडचा उपयोग जर होत असेल तर मी यापुढे नक्कीच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करीन. हे काम फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित नव्हते. तर या नंतर देखील यासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे.