जेव्हा उपेंद्रला मिळते बिग बीची ‘झप्पी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 21:08 IST
बॉलिवूडचे ‘शहंशाह’ अमिताभ बच्चन यांनी कलाकारांच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित केले आहे आणि आजही करत आहेत. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, ...
जेव्हा उपेंद्रला मिळते बिग बीची ‘झप्पी’
बॉलिवूडचे ‘शहंशाह’ अमिताभ बच्चन यांनी कलाकारांच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित केले आहे आणि आजही करत आहेत. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी बच्चनसाहेबांसोबत काम करायला मिळावे.काम नाही तर निदान त्यांना एकदा भेटण्याची तरी संधी जरी मिळाली तर तो कलाकार कृतकृत्य होऊन जाईल. याबाबतीत आपला उपेंद्र लिमयेचे नशीब फार चांगले आहे.त्याने केवळ बिग बीसोबत कामच नाही तर त्यांची शाबासकीदेखील मिळवली आहे. ‘सरकार राज’ सिनेमात अमिताभसोबत एका सीनमध्ये काम करण्याची त्याला संधी मिळाली होती. आता खुद्द बच्चन समोर आहे म्हटल्यावर उपेंद्र थोडा नर्व्हस होता.पण उपेंद्र ठरला हाडामांसाचा कलाकार. त्याने एकदम मन लावून तो सीन पूर्ण केला. मग काही दिवसांनंतर चित्रपटाचा ‘ट्रायल शो’ पाहण्यासाठी तो संपूर्ण कुटुंबा समवेत गेला. त्यावेळी अमिताभसुद्धा उपस्थित होते.आयुष्य भर जपण्यासारखी आठवण सांगताना तो म्हणतो, ‘शो झाल्यानंतर बच्चनसाहेबांनी मला मिठी मारली आणि माझ्या कामाची स्तुती केली. हे सर्व माझ्यासाठी खूप अनपेक्षित होते. एवढ्या मोठ्या कलाकाराची शाबासकी मिळणे आणि तीदेखील एवढ्या आत्मीयतेने, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.’ वाह भाई उपेंद्र!