Join us  

मराठमोळ्या स्पृहा जोशीचा कोणता लूक तुम्हाला भावतो?, जाणून घ्या तिची स्टाइल स्टेटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 4:13 PM

स्पृहा जोशीचा कोणता लूक तुम्हाला जास्त आवडतो?

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा', देवा आणि बाबा यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तसेच स्पृहा जोशी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संपर्क साधत असते. नुकतेच तिने तिचे दोन लूकमधील फोटो शेअर केले आहेत आणि फॅशनबद्दल सांगितले आहे.

स्पृहा म्हणाली की, आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो, त्या कपड्यांत आपण छान वावरतो. त्यामुळे मी नेहमीच कम्फर्टला प्राधान्य देते. मला शॉपिंग करायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला अतिशय आवडतं. इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे घालायला मला आवडतात. मग त्यात जीन्स टॉप असोत, कुर्तीज असोत, वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट्स, वन पिसेस असोत या सगळ्या प्रकारचे कपडे घालणं मी तितकंच एन्जॉय करते. शॉपिंग करताना ब्रँडचा मी फार विचार करत नाही. त्यामुळे ब्रेंडड गोष्टींचा मुद्दा आला की माझे स्टायलिस्ट जे कपडे मला देतात ते मी आवडीने आणि प्रेमाने घालते.

स्पृहा जोशीला साड्या नेसायला फार आवडतात. साड्यांच्या आवडीनिवडीबद्दल सांगताना स्पृहा म्हणाली की, मला मनापासून साड्या नेसायला फार आवडतात. मग अगदी पैठणी, कांजिवरम पासून ते चंदेरी अशा सगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला मला आवडतात; पण एक आहे की, वजनाने जड असतील अशा साड्या मला आवडत नाहीत. त्यामुळे कॉटन आणि लिनन मटेरिअलच्या साड्यांवर माझं विशेष प्रेम आहे. कारण त्या वजनाने हलक्या असतात. तसंच मला माझ्या आईने, आजीने किंवा सासूबाईंनी नेसलेल्या जुन्या साड्या नेसायला प्रचंड आवडतात. त्यात एक वेगळ्या प्रकारची ऊब असते.

ती पुढे म्हणाली की, "उंच माझा झोका" या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका साकारताना मला नऊवारी साडी नेसायची होती आणि "रंगबाज फिर से" या वेब सिरीजमध्ये माझी राजस्थानी पद्धतीची वेशभूषा होती. या दोन्हीही प्रकारच्या वेशभूषांमध्ये मी छान कम्फर्टेबल होते. वेशभूषा ही तुम्हाला त्या व्यक्तिरेखेत शिरायला फार मदत करते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि या दोन्ही भूमिका साकारताना काही काळानंतर मला नऊवारी आणि राजस्थानी अशा दोन्ही प्रकारच्या साड्या नेसता येऊ लागल्या. मोगरा हे आमचं नेटक आम्ही आपापल्या घरून सादर करतो. तसं जरी असलं तरी त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची मानसिकता, आपल्या आधी आणि आपल्या नंतर कोणी काय रंगाचे कपडे घातले आहेत, प्रत्येकाच्या घरातलं फर्निचर कसं आहे या सगळ्याचा विचार करून आमची वेशभूषा ठरवली आहे आणि प्रत्येक प्रयोगात आम्ही ती एकच वेशभूषा फॉलो करतो.

मला माझा छान मेकअप करता येतो. कार्यक्रम किंवा कुठे इंटरव्ह्युजना जाताना मी स्वतः माझा मेकअप करते. फक्त स्क्रिनवर दिसण्यासाठी जो मेकअप केला जातो त्याला एक वेगळे कौशल्य लागते.

तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे मला आपल्या मेकअप आर्टिस्ट्सबद्दल खूप आदर आहे. ज्वेलरीच्या बाबतीत मी खुप पर्टिक्युलर आहे. मला वजनाने हलकी आणि नाजूक काम असलेली ज्वेलरी खूप आवडते.

सोन्याचे दागिने घालण्याकडे माझा फारसा कल नाही. त्याऐवजी मला चांदीची ज्वेलरी घालायला खूप आवडते, असे स्पृहा सांगत होती.

टॅग्स :स्पृहा जोशी