Join us  

'विकून टाक' चित्रपटाच्या पतंगांची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 5:32 PM

यंदा आकाशात 'विकून टाक' लिहिलेल्या पतंगांनी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे.

मकरसंक्रांती जवळ आली की आकाश रंगबिरंगी पतंगांनी व्यापून जातं आणि घरांच्या छतांवरून, गच्चीवरून 'ए लपेट' 'काट रे काट' 'काय पो छे' अशा हाळ्या सुरू होतात. सण आणि प्रमोशन यांची सांगड चित्रपटांसाठी घातली जातेच. उत्तंग ठाकूर निर्मित 'विकून टाक' हा चित्रपटही याला अपवाद नाही. ३१ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संक्रांतीचं निमित्त सुटलं असतं, तरच नवल होतं. यंदा आकाशात 'विकून टाक' लिहिलेल्या पतंगांनी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे. 

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी लोकांच्या चर्चेत असलेल्या गोष्टींची सांगड आपल्या चित्रपटाशी घालावी लागते. अनेक चित्रपट यात चांगलेच यशस्वी होतात. आता 'विकून टाक' या चित्रपटानेही यात बाजी मारली आहे.

संक्रांतीचा सण उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. तिळगुळ वाटण्याबरोबर पतंगबाजी हेसुद्धा या सणाचं वैशिष्ट्य आहे. आणि आमच्या चित्रपटाच्या नावाचे पतंग बाजारात आले असतील, तर ते चांगलंच आहे. त्या दृष्टीने आम्ही या पतंगबाजीकडे बघतो, असं निर्माते उत्तुंग ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

'विकून टाक' लिहिलेले पतंग जसे आकाशात उडत आहेत, तशीच भरारी आमचा चित्रपट तिकीटबारीवरही मारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यंदा संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात पब्जी, छोटा भीम, दबंग-३ या चित्रपटांचे चित्र असलेले पतंग दिसत आहेत. विशेष म्हणजे पर्यावरणाचा विचार करून ते कागदापासून बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पतंगांमध्ये 'विकून टाक' या चित्रपटाचे नाव लिहिलेला पतंगही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अवयव दान या गंभीर विषयाकडे अत्यंत हलक्याफुलक्या नजरेने बघणारा ग्रामीण पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट ३१ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चंकी पाण्डे मराठीत पदार्पण करत आहेत.