Join us  

विक्रम गोखले यांना 'चित्रभूषण’पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:50 AM

चित्रपटसृष्टीत काम केल्याचं समाधान व्यक्त करताना अजूनही खूप काहीतरी करायचं असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘चित्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना बोलून दाखवली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रपटसृष्टीच्या विविध विभागांमध्ये प्रदीर्घ काळ महत्त्वपूर्ण  योगदान दिलेल्या मान्यवरांना ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ या पुरस्काराने गौरविले जाते. यंदाच्या ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या भव्य-दिव्य दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.

चित्रपटसृष्टीत काम केल्याचं समाधान व्यक्त करताना अजूनही खूप काहीतरी करायचं असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘चित्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार मिळवण्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली असून या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाचे यावेळी आभार मानले.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार सोहळ्याला प्रारंभ झाला. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान वेगवेगळ्या नृत्याविष्काराचा आस्वाद उपस्थितांना घेता आला. चित्रपट महामंडळाच्या वाटचालीचा आणि या पुरस्काराविषयीचा आढावा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतला. मंडळाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानत सोहळ्याची सांगता केली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.

महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहकार्यवाह विजय खोचीकर, संचालिका चैत्राली डोंगरे, संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, तसेच महामंडळाचे इतर पदाधिकारी, संचालक, सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :विक्रम गोखले