ज्येष्ठ नाट्यनिर्माते रामकृष्ण नायक यांना जीवनगौरव पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 19:14 IST
मराठी रंगभूमीवर व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधून अनेकविध विषय हाताळणा-या आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाºया नाटकाचा त्यातील कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा ...
ज्येष्ठ नाट्यनिर्माते रामकृष्ण नायक यांना जीवनगौरव पुरस्कार
मराठी रंगभूमीवर व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधून अनेकविध विषय हाताळणा-या आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाºया नाटकाचा त्यातील कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा नुकताच ठाणे येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ नाट्यनिर्माते रामकृष्ण नायक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात ज्या धि गोवा हिंदू असोसिएशनने मोलाची कामगिरी बजावली, त्या आघाडीच्या नाट्यसंस्थेच्या कलाविभागाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिल्पकार म्हणजे रामकृष्ण नायक. धि गोवा हिंदू असोसिएशनचे अर्ध्वयु असलेल्या नायक यांनी तब्बल ४९ नाटकांची निर्मिती केली आणि यातील बहुतेक सर्वच नाटकांनी लोकप्रियतेची अनेक यशोशिखरे सर केली.‘संगीत संशयकल्लोळ’, ‘करीन ती पूर्व’, ‘संगीत शारदा’, ‘होनाजी बाळा’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘रायगडाला जेव्हा जाग येत’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’, ‘सुर्याची पिल्ले’, ‘संध्याछाया’ पासून ते ‘तू तर चाफेकळी’पर्यंत एकाहून एक अजरामर नाट्यकृतींच्या निर्मितीतील महत्त्वाचे नाट्यकर्मी म्हणून रामकृष्ण नायक यांची ओळख आहे. त्यांच्या या बहुमोल कार्याचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.प्रत्यक्ष बालगंधर्व यांना आपल्या हार्मोनियमच्या सुरावटींनी साथ देणारे ज्येष्ठ हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना रामकृष्ण नायक म्हणाले की, ‘आर्थिक अडचणींच्या काळातही अनेक मोठ्या कलाकारांनी लेखकांनी आणि प्रेक्षकांनीही मोलाची साथ दिली त्यामुळेच ही संस्था उभी राहू शकली. पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टींचा मोह टाळून अविरत सेवा हा एकच ध्यास ठेवून काम केलं. यशावर दावा न करता रंगभूमीची सेवा करणे हाच आम्ही धर्म मानला. सेवेला धर्माची बैठक दिल्यामुळे त्या सेवेचं आम्ही कधीही बाजारीकरण केलं नाही आणि रंगभूमीशी कायम इमान राखलं. त्याग, निष्ठा, श्रद्धा आणि सातत्य या चतु:सूत्रीच्या आधारावर वाटचाल केली. आजच्या पिढीतील कलाकारांनी, नाटककारांनी ही वाट धरली तर रंगभूमी त्यांच्या पदरी कधीच अपयश टाकणार नाही याची मी खात्री देतो. आजवर रंगभूमीशी निष्ठा राखून केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे.’ यावेळी त्यांनी वसंतराव कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. व्यावसायिक नाटकांत यावर्षी ‘दोन स्पेशल’ या नाटकाने बाजी मारत यावर्षीचा सर्वोत्कृष्ट नायक, दिग्दर्शक आणि नाटकाचा तर प्रायोगिक मध्ये ‘एकूट समूह’ने यंदाचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान मिळवला. सर्वोत्कृष्ट संगीत - अनमोल भावे, नेपथ्य - प्रदीप मुळ्ये, अभिनेता- जितेंद्र जोशी, दिग्दर्शक- क्षितीज पटवर्धन आणि सर्वोत्कृष्ट नाटक या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान अमृता सुभाषला ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकासाठी मिळाला. या सोहळ्यात डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, अतुल परचुरे, प्रियदर्शन जाधव, संदीप पाठक आणि इतर अनेक कलाकरांनी विविध नाटकांतील प्रवेश सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातून आपल्या गायकीने मंत्रमुग्ध करणारे शास्त्रीय गायक महेश काळे यांनी काही नाट्यगीतं सादर करून या मैफलीत एक वेगळी बहार आणली. सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि वैभव मांगले यांनी या देखण्या सोहळ्याचं बहारदार निवेदन केलं.