Join us  

Sulochana Latkar: अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली!, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 7:24 PM

Sulochana Latkar Passed Away: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या.  

आपल्या सोज्ज्वळ दिसण्यानं आणि वात्सल्यपूर्ण अभिनयानं सिनेप्रेमींच्या मनात घर करणाऱ्या, मराठी सिनेमांमध्ये नायिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि बॉलिवूडच्या पडद्यावर आई म्हणून मान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुलोचनादीदींची प्राणज्योत आज मालवली. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ९ मे रोजी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  दरम्यान, आज संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 

सुमारे सात दशके आपल्या अभिनयाने मनोरंजन करणाऱ्या  सुलोचना लाटकर ह्या मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये सुलोचना दीदी या नावाने परिचित होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. सुलोचनादीदींनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.  सुरुवातीच्या काळात त्यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं.  पद्मश्री, तसेच महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या अभिनयाचा गौरव करण्यात आला होता. 

सुलोचना दीदींवर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर काल रात्रीपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचनादीदींचं पार्थिव उद्या सकाळी ११ वाजल्या पासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर उद्या सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. 

सुलोचना दीदींनी एकटी, धाकटी जाऊ, पारिजातक, मीठभाकर, मोलकरीण, वहिनींच्या बांगड्या या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर  आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. सुलोचना दीदी यांना पद्मश्री, तसेच महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

टॅग्स :सुलोचना दीदीमहाराष्ट्र