Join us

एकाच गाण्याच्या दोन चाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 15:50 IST

एखाद्या गाण्याची चाल तयार झाली, की तेच गाणं पुन्हा वेगळ्या चालीत स्वरबद्ध करणं हे महाकठीण काम असतं. मात्र, संगीतकार ...

एखाद्या गाण्याची चाल तयार झाली, की तेच गाणं पुन्हा वेगळ्या चालीत स्वरबद्ध करणं हे महाकठीण काम असतं. मात्र, संगीतकार कौशल इनामदारनं हे शिवधनुष्य पेललं आहे. कौशलनं 'रंगा पतंगा' या चित्रपटात 'ए सनम आखों को मेरी खुबसूरत साज दे' ही रचना गझल आणि कव्वाली या दोन प्रकारांमध्ये संगीतबद्ध केली आहे. एकच गाणं दोन प्रकारे संगीतबद्ध करण्याचा मराठी चित्रपटातील बहुधा हा पहिलाच प्रयोग आहे. हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.चित्रपटाच्या पटकथेत गाण्याची जागा ठरलेली होती. मात्र, गाणं काय असेल हे निश्चित झालं नव्हतं. दरम्यान, चित्रीकरणाचं लोकेशन पाहण्यासाठी निर्माता व सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि टीम मूर्तीजापूरला गेले होते.  मूर्तीजापूरमध्ये फिरल्यानंतर प्रसाद नामजोशी यांना अचानक एक गझल आठवली. ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांची ती गझल होती. त्यांनी ती १९९७मध्ये त्यांच्या वहीत नोंदवून  ठेवली होती. आवडलेली कविता तारखेसह लिहून ठेवण्याची त्यांना सवय आहे. मात्र, 'ए सनम आँखो को मेरी खूबसुरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे' हा पहिला शेर वगळता उर्वरित गझल त्यांना आठवत नव्हती. पुण्याच्या परतीच्या प्रवासात त्यांना उर्वरित गझल आठवली. त्यानंतर त्यांनी जमादार यांच्याशी संपर्क साधून गझल वापरण्याची रितसर परवानगी घेतली. चित्रपटातील दोन प्रसंगावेळी  गाणं वापरण्याचा विचार सुरू होता. प्रसंगांचे मूड पाहून दोन वेगळी गाणी करण्यापेक्षा एकच गाणं दोन प्रकारांमध्ये वापरण्याची कल्पना नामजोशी यांना सुचली. त्यामुळे एकच रचना गझल आणि कव्वाली या दोन प्रकारांत संगीतबद्ध करण्यात आली. आघाडीचा गायक आदर्श शिंदेनं ही दोन्ही गाणी गायली आहेत. 'इलाही जमादार यांचे शब्द विलक्षण प्रभावी आहेत. त्यांनी लिहिलेलं हे गाणं चित्रीकरणापूर्वीच माझ्याकडे देण्यात आलं होतं. तसंच एकच गाणं दोन प्रकारे वापरण्याची कल्पना प्रसाद नामजोशी यांनी सांगितली होती. संगीतकार म्हणून हा प्रयोग नक्कीच आव्हानात्मक होता. वेळ घेऊन एकच गाणं दोन प्रकारे संगीतबद्ध केलं. या दोन्ही गाण्यांमुळे चित्रपटाचा आशय अधिक गडद केला आहे,' अशी भावना संगीतकार कौशल इनामदारनं व्यक्त केली. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित 'रंगा पतंगा'मध्ये मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, नंदिता धुरी, गौरी कोंगे, भारत गणेशपूरे, अभय महाजन, उमेश जगताप, सुहास पळशीकर आदींच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.