Join us  

थरारक प्रसंग..! मृण्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:13 PM

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील मुंबईतील त्या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे.

काही घडलेले प्रसंग किंवा घटना आठवली तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. अशीच मुंबईत घडलेल्या एका घटनेचे परिणाम त्या घटनेच्या नंतर अनेक वर्षांच्या कालावधीनंतरही विसरू शकलेले नाही. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील मुंबईतील त्या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे. ही घटना म्हणजे मुंबईत झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला. अॅमेझॉन प्राइमवर लवकरच या घटनेवर आधारीत वेबसीरिज मुंबई डायरिज २६/११ भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये मृण्मयी डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने मृण्मयीला ते क्षण वेगळ्या दृष्टीकोनातून साकारण्याची संधी मिळाली. परंतु, आजही तिच्या मनात असणारी २६/११ हल्ल्याची दहशत घर करून कायम आहे.

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मृण्मयीने २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या क्षणाच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली की त्यावेळी मी पुण्यातच होते, एका मालिकेचे शूटिंग सुरु झाले होते. तेव्हाच मुंबईत हल्ला झाल्याचे कानावर आले होते. मुंबई पुण्यापासून फारशी दूर नाही हे ठाऊक होतं. शारीरिक दृष्टीने आम्ही त्यावेळी मुंबईबाहेर असलो तरीही मुंबईबाबत चिंता वाटत होती. त्यावेळी नातेवाईकांना, मित्रमंडळींना आम्ही फोन करत होतो, काळजीने चौकशी करत होतो. सातत्याने टीव्हीवर बातम्या पाहत होतो. ती एक भयंकर रात्र होती, ज्या रात्रीनंतर, त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनंतर साऱ्यांचे जीवन बदलले होते. मुंबईतील परिस्थिती बदलली होती.

मुंबईबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली की, मुंबई म्हणजे सारे काही. एक वाहतूक कोंडी वगळली तर, या शहराची कोणतीही गोष्ट मला खटकत नाही. मुंबईने जगण्याची प्रेरणा दिली, मानसन्मान दिला, ओळख दिली.

मुंबईत आपली ओळख निर्माण करण्यासाठी बरेचजण येत असतात. अनेकांच्या करिअरचा संघर्ष या शहरात होतो. या सर्वांनीच मुंबईला आपलेसे केले आहे. त्यामुळे या शहराचा आदर केला पाहिजे, शहराच्या स्वच्छतेला गालबोट लागणार नाही, असे वागले पाहिजे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे26/11 दहशतवादी हल्ला