Join us  

‘समांतर-२’च्या दिग्दर्शनामध्ये अनेक आव्हाने होती पण दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 8:00 AM

'समांतर'च्या पहिल्या भागाला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकांनी पसंती दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर 'समांतर-२ ‘एमएक्स प्लेयर’वर सुरु झाली आहे.

'समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी म्हटले आहे की या सिझनचे दिग्दर्शन करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती कारण एकतर ते पहिल्यांदाच वेब मालिकेचे दिग्दर्शन करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रीकरण करणे त्यात कोविडमुळे लॉकडाऊन सुरु होते. पण या सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी त्यांच्या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे मालिका पूर्ण केली. ‘समांतर’च्या सिझन-१ ला अभूतपूर्व असे यश मिळाले. 

या वेब मालिकेला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकांनी पसंती दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर समांतर-२ ‘एमएक्स प्लेयर’वर सुरु झाली आहे. नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत तसेच सई ताम्हणकर यांच्या भूमिका या सिझनमध्ये आहेत. त्यामुळे या सिझनला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. ही वेब मालिका प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या लोकप्रिय मराठी कादंबरीवर आधारित आहे. 

 

या मालिकेबद्दल बोलताना समीर विद्वांस म्हणाले, “समांतर’ ही नाट्यमय मालिका असून ती गूढता व रोमांचने पुरेपूर भरलेली आहे आणि त्यामुळे ती रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मराठीमध्ये तयार झालेल्या या वेब मालिकेचा पहिला सिझन हिंदी, तेलगु आणि तमिळ या भाषांमध्ये पुढे डब झाला. या वेब मालिकेचा दुसरा सिझन आम्ही मुंबई, पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, भोर आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यामध्ये चित्रित केला आहे. त्यामुळे या मालिकेचा नैसर्गिक लुक कायम राहिला आहे.”

 

‘समांतर-२’ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी समीर विद्वांस यांनी अर्जुन आणि कार्तिक यांचे आभार मानले आहेत. या दोघांनी या मालिकेमध्ये सर्जनशीलपणे लक्ष घातले आणि दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. “ते नवीन संकल्पनांचा खुल्या दिलाने स्वीकार करतात आणि त्या प्रत्यक्षात कशा येतील यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांनी ‘समांतर’च्या निर्मितीच्या काळात कलाकार आणि माझ्याबरोबर अगदी जवळून काम हेले आणि प्रत्येकजण सर्वोत्तम कामगिरी करेल हे पहिले,” असेही ते म्हणाले.

‘समांतर-२’बद्दल बोलताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “समांतर’ची कथा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडेल आणि ते ती उचलून धरतील याची आम्हाला पूर्ण खात्री होती. समांतर-२ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रर्तिसाद मिळतो आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पुढेही विविध विषय आणि प्रकारांवर आधारित आणखीही चांगल्या वेब मालिका आम्हाला करायच्या आहेत.” 

 

टॅग्स :समीर विध्वंस