Join us  

माळीण दुर्घटनेचा थरार आता मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 1:54 PM

जुन्नर तालुक्यातील माळीण गावात २०१४मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण या चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जुन्नर तालुक्यातील माळीण गावात २०१४मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण या चित्रपटातून ती घटना २९ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. 

ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची  संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. व्हीएफएक्स दिवाकर घोडके यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. 

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. एक संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हळूवार आणि हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम संहिता, दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता "एक होतं माळीण" या चित्रपटाचीही भर पडणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्यानं कथानक लिहिलं गेलं आहे. मोठ्या मेहनतीनं हा चित्रपट साकारला असून आता २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :माळीणगाव