Join us  

२० वर्षांत इतका बदललाय 'श्वास'मधील बालकलाकार, समोर उभा असूनही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 6:25 PM

Shwaas Movie : तब्बल २० वर्षानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे आणि आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांची भेट घडून आली.

२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वास सगळ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर २००४ मध्ये श्वास चित्रपटाला सर्वाोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी साकारली होती तर नातवाची भूमिका अश्विन चितळेने. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २० वर्षे होत आहेत. तब्बल २० वर्षानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे आणि आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांची भेट घडून आली. यावेळी  कलाकारांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अरुण नलावडे या चित्रपटानंतर अश्विनला भेटलेच नव्हते. त्यामुळे त्यांना आता तो कसा दिसल असेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो समोर असतानाही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत. 

श्वास चित्रपटातील कलाकारांच्या रियुनीयनवेळी अरुण नलावडे यांच्यासमोर अश्विन चितळे उभा होता. तरीदेखील ते अश्विन कुठे आहे? म्हणून विचारू लागले, तेव्हा समोर असलेल्या अश्विनला पाहून अरुण नलावडे चकित झाले. अश्विनमध्ये झालेला बदल पाहून अरुण नलावडे यांनी त्याला सुरुवातीला ओळखलेच नव्हते. कारण मी त्याला या २० वर्षात परत कधीच भेटलो नव्हतो. त्यामुळे तो आता कसा दिसतो हे मला माहीतच नव्हते, अरुण नलावडे या मुलाखतीत म्हणाले.

 श्वास चित्रपटाच्या आठवणी सांगताना अरुण नलावडे म्हणतात की, श्वास हा संपूर्ण चित्रपट निगेटिव्हवर शूट करण्यात आला होता. जसाच्या तसा चित्रपट शूट केल्यामुळे साऊंडवर सहा महिने काम करावे लागले होते. तशाही परिस्थितीत आम्ही ते डायलॉग मी ,अश्विन आणि अमृता सुभाषने म्हटले होते. याची गंभीरता त्यावेळी कळली नव्हती. आताच्या घडीला प्रगत तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. 

टॅग्स :अरुण नलावडे