Join us  

‘थापाड्या’ मराठी सिनेमाने करणार नव्या वर्षाची म्युझिकल सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 7:00 PM

दाक्षिणात्य, हिंदी चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ब्रिंदा पारेख आणि अभिनय सावंत यांची लव्ह केमिस्ट्री दाखवणारे ‘धक धक होतंय माझ्या उरी’ हे रोमँटीक  गाणे तरुणाईला आपलेसे वाटते.  

संगीत हा चित्रपटाच्या निर्मितीतील एक महत्वपूर्ण घटक असतो. कर्णमधुर संगीतात बहरलेली गाणी प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेशी एकरूप करतात. मानसी प्रॉडक्शन्स निर्मित, मास्क ग्रुप प्रस्तुत ‘थापाड्या’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट नव्या वर्षाची म्युझिकल सुरुवात करणारा ठरणार आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची पाच गाणी असून हा चित्रपट संगीतप्रेमींना म्युझिकल ट्रीट आहे.

अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ ची गाणी पंकज पडघन आणि चैतन्य आडकर यांनी स्वरबद्ध केली आहेत. विद्येची देवता गणपती वर स्तुतिसुमने उधळणारे आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘गणपती गजवदना’ हा गण मन प्रसन्न करणारा आहे. तर ‘थाप मारून थापाड्या गेला’ ही महाराष्ट्रातील वैभवशाली परंपरा सांगणारी लावणी भुरळ घालणारी आहे, अभिनेत्री मानसी मुसळे हिच्या अदाकारीने नटलेल्या लावण्यांनी प्रेक्षक घायाळ होणार हे निश्चित. मानसी मुसळे ही ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना मधु कांबीकर आणि पांडुरंग घोटकर यांची शिष्या आहे. दाक्षिणात्य, हिंदी चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ब्रिंदा पारेख आणि अभिनय सावंत यांची लव्ह केमिस्ट्री दाखवणारे ‘धक धक होतंय माझ्या उरी’ हे रोमँटीक  गाणे तरुणाईला आपलेसे वाटते.  

चित्रपटातील गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, मंदार चोळकर आणि जयंत भिडे यांनी रचली आहेत. तर नृत्यदिग्दर्शन लॉजिनिअस, फुलवा खामकर, निकिता मोघे यांनी केले आहे. भाऊसाहेब भोईर आणि शरद म्हस्के यांची निर्मिती असलेला ‘थापाड्या’  येत्या शुक्रवारी (४ जानेवारी) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.