Join us  

मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:47 PM

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहायला अमेरिकेतले प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत असल्याची अभिमानाची गोष्ट समोर आलीय (swargandharva sudhir phadke)

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात  'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे.  'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अमेरिकेतही हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवल्याची आनंदाची गोष्ट समोर आलीय.

चोहोबाजुंनी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच परदेशातही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज 'हाऊसफुल'च्या दिशेने वाटचाल करत आहेत तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ग्लोबलीही 'सुपरहिट'चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे.

या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे.'' 

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :सुनील बर्वेसुखदा खांडकेकरमृण्मयी देशपांडेमराठीलंडनअमेरिका