Join us  

स्वप्नील जोशीने घेतलं रामललाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंत्रमुग्ध करणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 2:30 PM

अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत.

२२ जानेवारी २०२४ हा दिवस भारतीयांसाठी खूपच खास होता. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं. 'मंदिर वही बनाएंगे' प्रत्यक्षात उतरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडला. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज, साधुसंतांच्या उपस्थित हा भव्या सोहळा झाला. आता नुकतंच मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) अयोध्येला जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. त्याने सोशल मीडियावर याची झलक दाखवली आहे.

अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. प्रत्येकाचीच मनोकामना या माध्यमातून पूर्ण झाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या मित्रमंडळींसोबत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. याचा अनुभव सांगताना तो लिहितो, "२२ जानेवारी २०२४ हा दिवस माझ्यासाठी/ सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामांचं अयोध्या नगरी मधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही पण एक मात्र ठरवलं होतं की ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्री रामचद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं.

काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला. आणि सोबत होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभूंचं दर्शन, सरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता.... सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी, ‘ह्याच साठी केला होता अट्टाहास’ असं वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना.|| जय श्री राम || 

स्वप्नील जोशीने व्हिडिओमधून त्याचा संपूर्ण प्रवासाची झलक दाखवली आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आल्यानंतरचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय.

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेताअयोध्यासोशल मीडिया