Join us  

संगीताला मुख्य अभ्यासक्रमात स्थान मिळण्यासाठी चर्चासत्र, हजर राहाण्यासाठी साधा या क्रमांकावर संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:05 PM

संगीत शिक्षण प्रमाणपात्रता, संगीत क्षेत्रात व्यवसायिक संधी, कलाकाराचा व्यक्तिमत्त्व विकास असे चर्चासत्राचे प्रमुख विषय आहेत. हे चर्चासत्र 24 ऑक्टोबर 2018 ला सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे येथे होणार आहे.

64 कलांचा सांस्कृतिक इतिहास असलेला आणि समकालीन कला क्षेत्रात जगात अग्रेसर असलेला आपला भारत देश आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे. पिढीजात चालत असलेल्या भारतीय संगीताचा सांस्कृतिक पाया जरी भक्कम असला तरी भारतामध्ये या कलेचे औपचारिक शिक्षण घेऊन त्याकडे एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून आजही बघितले जात नाही. संगीत शिक्षणात प्रमाणपात्रता आणून संगीताला मुख्य अभ्यासक्रमात मानाचे स्थान मिळावे यासाठी महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन तर्फे संगीत शिक्षण प्रमाणपात्रता या विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. संगीत तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित काही नामांकित व्यक्ती या चर्चासत्रामध्ये पॅनल सदस्य म्हणून सहभागी होऊन आपले बहुमोल विचार मांडणार आहेत. 

महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधील संगीत शिक्षकांनी एकत्र येऊन संगीत क्षेत्रातील शिक्षण प्रमाणपत्र कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच संगीताविषयी गोडी आणि गांभीर्य निर्माण कसे होईल याविषयी मान्यवरांचे अनुभवी बोल ऐकून त्यानुसार शिक्षण पद्धती आत्मसात करणे यासाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन, ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले, पुणे महाविद्यालय आणि संगीत विभाग-एस, एन. डी. टी महाविद्यालय पुणे केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आले आहे. 

संगीत शिक्षण प्रमाणपात्रता, संगीत क्षेत्रात व्यवसायिक संधी, कलाकाराचा व्यक्तिमत्त्व विकास असे चर्चासत्राचे प्रमुख विषय आहेत. हे चर्चासत्र 24 ऑक्टोबर 2018 ला सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे येथे होणार आहे. गायक आनंद भाटे, गायिका सावनी शेंडे, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, संगीत संजोयक आणि संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर, संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचूड, एसएनडीटी महाविद्यालय पुण्याच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. शितल मोरे, ललित कला केंद्राचे संगीत विभाग प्रमुख चैतन्य कुंटे यांचा पॅनल सदस्यामध्ये समावेश आहे. 

महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशनचा अध्यक्ष प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर असून या चर्चासत्राच्या अधिक माहितीसाठी तुम्ही 9168635055 या नंबरवर किंवा www.maharashtramusicicolympiad.com या वेबसाईटवर किंवा exam@maharashtramusicicolympiad.com वर संपर्क साधू शकता. 

टॅग्स :स्वप्निल बांदोडकर