Join us  

नराधमांची भूमी...लाज वाटली पाहिजे...!! पालघरच्या घटनेवर सुमीत राघवनची जळजळीत प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:41 PM

काय म्हणाला सुमीत?

ठळक मुद्दे पालघर घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

पालघरमधील एका गावात गुरूवारी रात्री कांही लोकांनी तीन साधूंना ठार मारल्याची घटना घडली. दोन दिवसांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता  अभिनेता सुमीत राघवन यानेही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. होय, ट्विटरवर पोस्ट लिहून सुमीतने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.या घटनेनंतर मी सुन्न झालो आहे. भीतीदायक आणि लाजिरवाणारा प्रकार आहे. संतांची, वीरांची भूमी असं म्हणणं यापुढे टाळूया. कारण नराधमांची भूमी जास्त योग्य शब्द आहे,अशी जळजळीत प्रतिक्रिया त्याने दिली.

‘मी सुन्न झालोय़ भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे जे घडलं... संताची, वीरांची भूमी असं टाळूया आपण यापुढे बोलायचं.. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे. लाज वाटली पाहिजे, असे सुमीतने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटमध्ये सुमीतने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे. याशिवाय त्याने आणखी  ट्विट केलं आहे.

काय म्हणाला सुमीत?‘ मी तो व्हीडिओ बघितला नसता तर बरं झालं असतं. आता ही दृश्य माझ्यासमोरून जात नाहीयेत. एखाद्या म्हाता-या माणसाला जमाव दगडं मारून हत्या कशी करू शकतं? म्हाता-याचं संरक्षण करण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते, असे तो पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला.

 या ट्वीटनंतर सुमीतने आणखी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने लिहीलं, ‘जमाव इतका क्रूर आणि निर्दयी कसा असू शकतो? जमावातील एकानेही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न कसा केला नाही? मला वाटतंय की कोणी तरी केलाच असेल.. बरोबर ना? मला खरंच कळत नाहीये. या सगळ्याकडे मी कशापद्धतीने पाहू.. जरा थांबूया.. विचार करूया आणि स्वत:लाच प्रश्न विचारूया.. जे झालं ते योग्य होतं का?’ दरम्यान पालघर घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

टॅग्स :सुमीत राघवन