Join us  

भर पावसात संजय मोने यांनी केलं होतं सुकन्याला प्रपोज; जाणून घ्या त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 2:55 PM

Sukanya and sanjay mone: पडद्यावर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची रिअल लाइफ लव्हस्टोरी भन्नाट आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे सुकन्या कुलकर्णी-मोने (sukanya mone) आणि संजय मोने (sanjay mone). आपल्या कसदार अभिनयशैलीच्या जोरावर या दोन्ही दिग्गजांनी मराठी सिनेसृष्टीत त्यांचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या जोडीने अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही प्रेक्षक तितकीच पसंती देतात. विशेष म्हणजे पडद्यावर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची रिअल लाइफ लव्हस्टोरी भन्नाट आहे. अलिकडेच या जोडीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या 'लव्ह गेम लोचा’ या सेगमेंटमध्ये सुकन्या यांनी त्यांच्या प्रपोजचा किस्सा सांगितला.

सुकन्या मोने त्यांच्या गोड आणि गप्पीष्ट स्वभावामुळे कायमच समोरच्याला आपलंसं करत असतात. तर, संजय मोने थोडेसे मितभाषी पण आहेत. त्यामुळे या जोडीची लव्हस्टोरी नेमकी कशी असेल हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, संजय मोने प्रचंड रोमॅण्टिक असून त्यांनी चक्क भर पावसात सुकन्या यांना प्रपोज केलं होतं.

“एके दिवशी आमचा मॅनेजर जो आमचा मित्रही होता प्रताप सावंत, रात्री २ वाजता माझ्या घरी आला. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत कोण आणि कसा होता. तो अचानक रात्री २ वाजता माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं लग्न करत आहात? मी म्हणाले, कोण? तर तो म्हणाला, तू आणि संजय. मी म्हणाले, कुणी सांगितलं? तर तो म्हणाला, त्यानेच सांगितलं. आत्ता संजय टॅक्सीत आहे खाली. त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडत होता. मी खाली गेले आणि म्हणाले, काय मोने तुम्हाला लग्न करायचंय माझ्याशी? तर संजय म्हणाले, म्हणजे तुम्हाला नाही करायचं का? इथेच मी समजून गेले,” असं सुकन्या म्हणाल्या. 

पुढे त्या म्हणाल्या, "अशा प्रकारे आमचं सुरु झालं. पण, माझ्या घरातून थोडा प्रॉब्लेम होता. माझ्या आईने होकार द्यायला चार एक महिने लावले. आम्ही एकाच क्षेत्रात असल्यामुळे तिचा नकार होता. पण, तिला कळलं की या दोघांचं खरंच प्रेम आहे. मग ती तयार झाली. विशेष म्हणजे यात संजयचं एक होतं काही झालं तरी पळून लग्न करायचं नाही. ज्यावेळी घरातल्यांचा होकार येईल तेव्हाच लग्न करायचं. तसाही उशीर झालाय मग काय अजून थोडा होईल पण घरच्यांचा होकार असणं गरजेचं."

दरम्यान, सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच सुकन्या कुलकर्णी-मोने या बाईपण भारी देवा या सिनेमात झळकल्या होत्या.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीसंजय मोनेसेलिब्रिटीटेलिव्हिजन