Join us  

अशाप्रकारे 'अनन्या'साठी ऋतुजा बागवेला मिळाली कौतूकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:31 PM

ऋतुजा बागवेचा अभिनय पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने चक्क ऋतुजाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देत तिच्या कामाची प्रशंसा केली. 

ठळक मुद्दे 'अनन्या' नाटक प्रेक्षकांची मिळवतेय दाद ऋतुजाला एका प्रेक्षकाने दिला ५१हजाराचा धनादेश

अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या 'अनन्या' नाटकाचा नुकताच दादर येथील शिवाजी नाट्यमंदिरात प्रयोग पार पडला. यावेळी ऋतुजा बागवेचा अभिनय पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने चक्क ऋतुजाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देत तिच्या कामाची प्रशंसा केली. 

एकांकिकेवर आधारीत असलेले 'अनन्या' हे नाटक रंगमंचावर प्रेक्षकांची खूप दाद मिळवत आहे आणि या नाटकासाठी ऋतुजाला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. एका तरुणीने आपल्यातल्या शारीरिक उणिवेवर मात करत जगण्याच्या केलेल्या संघर्षाची गोष्ट या नाटकात रेखाटण्यात आली आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. या नाटकाचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडला. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका प्रेक्षकाला ऋतुजाचा अभिनय चांगलाच भावला. त्यांनी त्याच ठिकाणी नाव न जाहीर करण्याच्या विनंतीवर तिला ५१ हजाराच्या रक्कमेचा धनादेश देऊन तिचे कौतुक केले. या अविस्मरणीय क्षणाबद्दल ऋतुजाने सोशल मीडियावर सांगितले आहे.

 

आयुष्यातील हा क्षण कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री ऋतुजाने व्यक्त केली. यापुढे अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे लिहिले आहे. कौतुक म्हणून मिळालेल्या या रकमेतील काही रक्कम ही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून देणार असल्याचे तिने सांगितले. भालेकर सर यांचे आभार मानून तुमचा आशीर्वाद हे कौतुक मला माझ्यावर अभिनेत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची नेहमीच जाणिव करून देईल. अजून जास्त चांगले काम करेन व मन लावून काम करेन, असेही ऋतुजाने पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवे