Join us  

सुबोध भावे सोबत असलेल्या या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली होती मराठी चित्रपटसृष्टी, आज त्यांना ओळखणे देखील जातंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:05 PM

सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेले अश्रूंची झाली फुले हे नाटक पाहायला या अभिनेत्री आल्या होत्या.

ठळक मुद्देदया डोंगरे यांचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. पण दया डोंगरे यांना अनेक वर्षांनंतर पाहायला मिळाल्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड खुश झाले असून या फोटोसाठी सुबोधचे आभार मानत आहेत. 

मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू, करारी स्त्री अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला दया डोंगरे यांना पाहायला मिळाले आहे. दया डोंगरे यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा आज संध्याकाळी ०६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेले अश्रूंची झाली फुले हे नाटक पाहायला नुकत्यात अभिनेत्री दया डोंगरे गेल्या होत्या. या नाटकाच्या टीमसोबतचा त्यांचा एक फोटो सुबोधने नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबतच या नाटकातील शैलेश दातार आणि उमेश जगताप हे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दया डोंगरे यांचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. पण दया डोंगरे यांना अनेक वर्षांनंतर पाहायला मिळाल्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड खुश झाले असून या फोटोसाठी सुबोधचे आभार मानत आहेत. 

सुबोधचे आभार मानत एकाने लिहिले आहे की, तुमच्यामुळे दया डोंगरे यांना बऱ्याच वर्षांनी पाहिलं... खरंच खूप खूप आनंद झाला... तुमचे खरंच खूप आभार आणि दया डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन... तर एकाने फोटोवर कमेंट केली आहे की, सुबोध हा फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे खूप दिवसांनी दया डोंगरे यांना पाहण्याचा योग आला. दयाताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम. अश्रूंची झाली फुले टीमला दयाताईंचे प्रेम आणि आशिर्वाद मिळाले, खूपच भाग्यवान आहात तुम्ही सर्व.

तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टाहास, इडा पिडा टळो, माता द्रौपदी यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मायबाप, उंबरठा, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांना मायबाप आणि खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातील भूमिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे.  

टॅग्स :सुबोध भावे