Join us  

सुबोध भावेला मिळाली सगळ्यात मोठी कौतुकाची थाप, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 6:30 AM

त्याच्या चित्रपटातील भूमिका आणि नाटकांचा उल्लेख करत सरांनी त्याचं तोंडभरून कौतुक केले आहे.

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध बायोपिकमधील सुबोधचा अभिनय रसिकांना इतका भावला की या चित्रपटांना रसिक बायोपिकऐवजी भावेपिक म्हणू लागले आहेत. सुबोधच्या या अभिनयावर फिदा असणाऱ्या रसिकांमध्ये त्याचे गुरूसुद्धा आहेत. सुबोधने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमध्ये त्याने एका पत्राचा फोटो जोडला आहे. हे पत्र खुद्द सुबोधच्या शिक्षकांनी लिहिलं आहे. सुबोध ज्या पुण्यातील शाळेत शिकला त्या शाळेच्या सरांनी सुबोधला हे पत्र लिहिलं आहे. चतुरस्त्र कलावंत अशा शब्दांनी सुरू झालेल्या पत्रात सुबोधचं त्याच्या सरांनी भरभरून कौतुक केलं आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिका आणि नाटकांचा उल्लेख करत सरांनी त्याचं तोंडभरून कौतुक केले आहे. 

गुरूंकडून मिळालेली ही कौतुकाची थाप पाहून सुबोधही भारावला आहे. त्याने हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करत सरांचे आभार मानलेत. “ज्यांनी शाळेत आपल्याला शिकवलं, भाषेचे संस्कार केले, अशा आपल्या गुरूजींनी दिलेली ही कौतुकाची थाप आयुष्यभर पुरणारी आहे. मनपूर्वक धन्यवाद सर” अशी प्रतिक्रिया सुबोधने व्यक्त केली आहे. 

टॅग्स :सुबोध भावे