Join us  

सुबोध भावेने व्यक्त केली ही खंत, मराठी चित्रपटसृष्टीसाठी केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:27 PM

अभिनेता सुबोध भावेने एका पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान त्याची ही खंत व्यक्त केली.

ठळक मुद्देसुबोधने त्याचे मत व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार मी मराठी नाटक, चित्रपटसृष्टीच्या वतीने स्वीकारत आहे. मराठी सिनेजगताला उद्योग म्हणून मान्यता दिल्यास निर्मात्यांना बऱ्याच सोयी मिळू शकतील

जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या रोप्यमहोत्सवी वर्षा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही जागतिक उद्योगक्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेता सुबोध भावेलादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याबाबत सुबोधने खंत व्यक्त केली.

या पुरस्कार सोहळ्यात सुबोधने त्याचे मत व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार मी मराठी नाटक, चित्रपटसृष्टीच्या वतीने स्वीकारत आहे. मराठी सिनेजगताला उद्योग म्हणून मान्यता दिल्यास निर्मात्यांना बऱ्याच सोयी मिळू शकतील असे मला वाटते. सिनेमाचा पाया दादासाहेब फाळके यांनी रोवून, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर यांसारख्या दिग्गजांनी त्यात भरीव कामगिरी केली. पण तरीही आज मराठी निर्मात्यांकडे स्वत:चा स्टुडिओ नाहीये. याउलट दाक्षिणात्य राज्यांमध्ये तेथील निर्मात्यांनी सर्व यंत्रणा उभारल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या स्टुडिओंमुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. मराठी निर्मात्यांनी देखील स्टुडिओ उभारल्यास शूटिंग, साऊंड, एडिटिंग सह सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती देखील होईल. मराठी माणसाने चित्रपटसृष्टीचा पाया रोवला असला तरी आज मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीयेत.

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे या पुरस्कार सोहळ्याच्यावेळी म्हणाले की, मला धुमधडाका या चित्रपटासाठी मराठमोळे सुरेश महाजन यांनी कर्ज मिळवून दिले होते याची मला सदैव आठवण राहील. या शिवाय मराठवाड्यातील बरेच होतकरू कलाकार मुंबईत येऊन नाव कमावण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे.

टॅग्स :सुबोध भावे महेश कोठारे