Join us  

सोनाली कुलकर्णीने वाढदिवसाला फॅन्सना दिले सरप्राईज, फेब्रुवारीत झाला आहे साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:23 AM

सोनालीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.

ठळक मुद्देसोनालीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...'

सोनाली कुलकर्णीचा काल वाढदिवस होता. देशात लॉकडाऊन असल्याने तिने हा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत अतिशय साधेपणाने साजरा केला. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. तिने देखील तिच्या वाढदिवसाच्या  निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.

सोनालीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...' 

सोनाली कुणालसोबत नात्यात असल्याची तिने काही महिन्यांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर सोनाली आणि कुणाल लग्न कधी करतायेत याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती. सोनालीने साखरपुड्याविषयी सांगितल्यानंतर तिचे फॅन्स खूप खूश झाले असून सोशल मीडियाद्वारे ते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. केवळ सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटींनी देखील सोशल मीडियाद्वारे तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंमध्ये सोनाली अतिशय छान दिसत असून तिची आणि कुणालची जोडी खूपच छान असल्याचे तिचे फॅन्स तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. सोनाली आणि कुणालने अतिशय साधेपणाने केवळ जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दुबईत साखरपुडा केला होता.

कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो असे म्हटले जाते. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी