Join us  

फँडीतला जब्या सोबत दिसणारी तरुणी आहे तरी कोण? रोमँटिक फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 1:33 PM

इतक्या वर्षात त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल आला आहे. सोमनाथ अवघडे त्याच्या लूकमुळेच जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याचा एक फोटो समोर आला आहे.

‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण त्यानंतर हा गुणी अभिनेता दुसऱ्या कोणत्याही सिनेमात दिसला नाही. इतक्या वर्षात त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल आला आहे. सोमनाथ अवघडे त्याच्या लूकमुळेच जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो त्याच्या नवीन सिनेमातला आहे. 

सुनिल मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' हा सिनेमा १६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, कलाकार समोर आल्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  'रंग प्रीतीचा बावरा' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे या मुख्य जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे तर संजय नवगिरे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 

    प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'रंग प्रीतीचा बावरा' या रोमँटिक गाण्याला जसराज जोशी यांच्या सुमधुर आवाजाने चारचाँद लागले आहेत तर या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला स्वामी शैलेश ही १७ वर्षीय नवोदित गायिका लाभली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा एक किस्सा दिग्दर्शक सुनील मगरे यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे, ''या गाण्याचे चित्रीकरण आम्ही कोरोनाच्या काळात केले आहे. अर्थात सर्व नियम आणि अटींचे पालन करून. 'रंग प्रीतीचा बावरा' हे मॉन्टाज गीत असल्याने आम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करायचे होते. एका सीनसाठी आम्ही नगर जिल्ह्यातील माणगंगा, पारनेर हा भाग निवडला होता. सकाळी ७ वाजता शूट सुरु होणार होते. त्यानुसार आम्ही शूटिंगच्या स्थळी पोहोचलो. 

जिथे शूट होणार होते तिथे सापांचा सुळसुळाट होता. त्यामुळे शूट कसे करायचे हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. सापांमुळे अपूर्वाही घाबरत होती. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने मग काही सर्पमित्र बोलवून आम्ही ती जागा सुरक्षित करून घेतली. या सगळ्यात सातचे शूटिंग बारा वाजता सुरु झाले. या सगळ्या परिस्थितीत कलाकारांसह संपूर्ण टीमने खूप सहकार्य केले. तसे पाहता ही जागा धोकादायक असतानाही सर्वांनीच खूप हिम्मत दाखवली आणि या गाण्याचे चित्रीकरण नीट पार पडले. चित्रीकरणादरम्यान आलेला हा तणाव पडद्यावर प्रेक्षकांना कुठेही जाणवणार नाही.''