Join us

सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव नाट्य महोत्सवास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 17:05 IST

गेल्या सोळा वर्षापासून चित्रपट व नाट्य व्यवसायात प्रतिष्ठेचा ठरलेला संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या ...

गेल्या सोळा वर्षापासून चित्रपट व नाट्य व्यवसायात प्रतिष्ठेचा ठरलेला संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या नाट्य महोत्सवाला प्रारंभ झाला असून २१ मार्चपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सुरु झालेल्या या महोत्सवाचा श्रीगणेशा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि संजय उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला.यंदाच्या १६ व्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नाट्य विभागात एकूण २७ नाटकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शेवग्याचा शेंगा (श्री चिंतामणी), डोंट वरी बी हॅप्पी (सोनल प्रोडक्शन), ऑल दि बेस्ट २ (अनामय निर्मित), परफेक्ट मिस मॅच (सोनल प्रोडक्शन) आणि दोन स्पेशल (अथर्व निर्मित) या नाटकांनी पहिल्या पाचमध्ये बाजी मारली आहे. नाट्य विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या प्रदीप कबरे, रोहिणी निनावे आणि अविनाश खर्शीकर यांनी निवड झालेल्या नाटकांचे परिक्षण केले आहे.या नाटकांपैकी दोन स्पेशल हे नाटक काही अपरिहार्य कारणांमुळे नाट्यमहोत्सवात दाखवले जाणार नाही. त्याएवजी तिन्हीसांज या संगीतमय नाटकाचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे.त्याचबरोबर चित्रपट महोत्सव ६ आणि ७ एप्रिल २०१६ रोजी रवींद्र नाट्य मंदिरात साजरा होणार असून त्याची सर्वोत्कृष्ट १० चित्रपट लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती संस्कृती कला दर्पण संस्थेचे आयोजक अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी दिली आहे