Join us  

"दादा मला वाचवा..." गायक सुरेश वाडकरांची अजित पवारांना आर्त साद; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 9:14 AM

वाडकर यांनी 'तुमसे मिलके मुझे ऐसा लगा...आरमा हुये पुरे दिलसे हे गाणे अजित पवार यांना उद्देशून म्हटले.

नाशिक - शहरातील एका कार्यक्रमावेळी प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी नाशिकमध्ये संगीत अकादमी सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सांगत सुरेश वाडकरांनी दादा मला वाचवा अशी आर्त साद घातली. 

'सुविचार मंच'तर्फे सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण गुरुवारी महाकवी कालिदास कलामंदिरात अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गायक सुरेश वाडकर यांच्यासह अभिनेता हार्दिक जोशी अभिनेत्री अक्षया जोशी, अभिनेता गौरव चोपडा आदींना 'सुविचार गौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले.गायक सुरेश वाडकर म्हणाले की, नाशिकमध्ये संगीत शाळा काढायची आहे. पण जागेचे व्यवहार ज्ञान नसल्यानं माझी फसवणूक झाली आहे. हे दादांना चांगले माहिती आहे. कारण दादांनी २-३ वेळा सरकारी अधिकाऱ्यांना दम दिला होता. दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही. दादा ९० टक्के मी जवळ आलोय. १० टक्के काम का होत नाही हे माझं दु:ख आहे. काका मला वाचवा असं आपण म्हणतो, तसं दादा मला वाचवा असं अजितदादांना मदतीसाठी साकडं घातलं.

तसेच नाशिकच्या कलावंतांमध्ये टॅलेंट आहे. येथे संगीत अकादमी सुरु करण्यासाठीचे ९० टक्के काम झाले आहे, मात्र १० टक्के काम पूर्ण होण्यासाठी अडचणी सुटत नसल्याचे खूप दुःख आहे. 'दादा (अजित पवार) मला वाचवा...तेव्हाच माझे स्वप्न पूर्ण होईल' अशी भावनिक साद वाडकर यांनी घातली. त्याचसोबत माझा श्वास थांबेपर्यंत मी गात राहणार असल्याचे सांगून वाडकर यांनी 'तुमसे मिलके मुझे ऐसा लगा...आरमा हुये पुरे दिलसे हे गाणे अजित पवार यांना उद्देशून म्हटले. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी देखील हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी आजच चर्चा करणार असल्याचे सांगून वाडकर यांच्याशी तरुणपणापासूनचे मैत्रीचे नाते जपणार असल्याची ग्वाही दिली.

अजित पवार काय म्हणाले?

आपलं काम करताना नाउमेद न होता सकारात्मकतेने काम करत राहणं आवश्यक आहे. रसिकांनी देखील कोणत्या गाण्यास शिट्टी वाजविली पाहिजे याचे भान ठेवा, असे सांगून पवार यांनी चिमटे घेतले. मंत्री छगन भुजबळ यांचेही भाषण झाले.  

टॅग्स :अजित पवारसुरेश वाडकर