Join us

​'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये होणार एक महत्वपूर्ण बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 09:57 IST

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली ...

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करतानादेखील दिसून येत आहे. उमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे. आजच्या पिढीतील नवरा बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. कारण, स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार असून, चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील हे नाटक आहे. आजदेखील हे नाटक जोरात चालत असल्यामुळे, नाटकातील हा महत्वपूर्ण बदल नाट्यरसिकांना अचंबित करणारा आहे. याविषयी स्वतः स्पृहा जोशी हिने आपल्या सोशल नेट्वर्किंग साईटवर माहिती दिली. 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. मात्र काही इत्तर कमिट्मेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंड चालू राहील असा मला विश्वास आहे.  सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नवराबायकोच्या नात्याची व्याख्या आणि विचार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, हा प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या नाटकाला प्रेक्षकांची अशीच भरभरून साथ लाभो ही सदिच्छा'. असे तिने सांगितले.