Join us  

​सिद्धार्थ चांदेकर का झाला भावूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2017 12:41 PM

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्याने झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार ...

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्याने झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटातून खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ हा मुळचा पुण्याचा आहे. पण कामाच्या निमित्ताने तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात आहे. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला तो त्याच्या काही मित्रांसोबत एकत्र राहात होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे सगळेच मित्र वेगवेगळे राहायला लागले आहेत. सिद्धार्थसुद्धा त्यांच्यापासून वेगळा होऊन दुसरीकडे राहात आहे. पण त्याने नुकतेच त्याचे घर पुन्हा एकदा बदलले आहे. यावेळी त्याने त्याच्या फेसबुकवर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. यावरून तो आजवर ज्या ज्या घरात राहिला, त्या घराशी तो भावनिकदृष्ट्या किती जोडलेला आहे हे कळून येत आहे. सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला आठवतेय दोन वर्षांपूर्वी माझ्या मित्रांनी भरलेले विलेपार्लेमधील घर सोडून मी गोरेगावला शिफ्ट झालो. पाच वर्षं एकत्र राहिल्यानंतर आम्ही सगळे वेगळे राहायला लागलो. खरे तर त्या पाच वर्षांचा हँगओव्हर उतरायलाच दोन वर्षं गेली. आज पुन्हा घर शिफ्ट केलंय आणि परत त्यांच्याच जवळ आलोय. काय मजा असते ना घर शिफ्ट करण्याची... कितीही जवळचा माणूस असला तरी तो दाढी करून आल्यावर ओळखूच येत नाही. तसेच काहीसे घराच्याबाबतीत घडते. सगळे सामान काढल्यावर माझे घर तसेच दिसू लागले आहे. खरेच विचित्र वाटते आहे. मी मुंबईत बहुतेक तिसऱ्यांदा घर बदलतोय. पण आपण कितीही निगरगट्ट असो की मॉडर्न विचारसरणीचे असो घर सोडताना वाईट हे वाटतेच. आपल्याला वाटते आठवणींवर आपला हक्क आहे. पण तो हक्क त्या जागेचा असतो. तो आपण घेऊन जातो. पण ती जागा तशीच राहाते मग निर्जीव... नवीन घर मित्रांच्या जवळ आहे. तिथे नवीन आठवणी बनणारच. पण आजपर्यंत जिथे जिथे राहिलो, त्या जागा स्वप्नात येत राहणार... Also Read : ​सिद्धार्थ चांदेकरने जागवल्या लहानपणीच्या आठवणी