सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या 'माणूस एक माती'चे पोस्टर झाले लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 14:38 IST
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक वेगवेगळ्या आणि चांगल्या विषयांवरचे चित्रपट बनवले जात आहेत. असाच एक आगळ्यावेगळ्या विषयावरचा माणूस एक माती ...
सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या 'माणूस एक माती'चे पोस्टर झाले लाँच
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक वेगवेगळ्या आणि चांगल्या विषयांवरचे चित्रपट बनवले जात आहेत. असाच एक आगळ्यावेगळ्या विषयावरचा माणूस एक माती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाँच करण्यात आले. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार आहे.सध्या प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. या धकाधकीच्या जीवनात लोकांना नात्यांचा कसा विसर पडतोय याचे चित्रण करणारा 'माणूस एक माती' हा चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ एका वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. सिद्धार्थचा हा लूक त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश झाडे असून संगीतकार-गीतकार प्रशांत हेडाऊ आणि अमर देसाई आहेत.बदलत्या काळातली नाती, नात्यांकडे पाहण्याचा बदलणारा दृष्टिकोन या आशयसूत्रावर 'माणूस एक माती' बेतलेला आहे. हा एक सकस कौटुंबिक चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तसेच स्वप्नील राजशेखर, रूचिता जाधव, हर्षा गुप्ते आणि वरद चव्हाण हे कलाकारदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.माणूस एक माती या चित्रपटाचे पोस्टर अंगावर शहारा आणणारे आहे. या पोस्टरमध्ये एक म्हातारा माणूस आपल्याला दिसत आहे. या म्हाताऱ्या माणसाचे केस, दाढी वाढलेले असून तो प्रचंड दुःखी दिसत आहे. हा म्हातारा माणूस सिद्धार्थ जाधव आहे. सिद्धार्थचा या चित्रपटातील मेकअप खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो म्हातारा सिद्धार्थ असल्याचे काही क्षण आपल्याला ओळखताच येत नाहीये.