Join us  

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या मिस यू मिस्टरचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 5:19 PM

‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

ठळक मुद्देसिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत असल्याने 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' मध्ये बऱ्याच समस्या येतात.

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या गाण्याने सोहळ्यात बहार आणली. ‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गीते वैभव जोशी यांनी लिहिली असून दीपा त्रासी आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी या चित्रपटांची सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत असल्याने 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' मध्ये बऱ्याच समस्या येतात. मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ जूनला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे.  

‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर या ट्रेलरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे सांगते, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर सांगतो, “मृण्मयीसोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी या चित्रपटाचे खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”

 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमृण्मयी देशपांडे