Join us

शूटिंग हिंदी सिनेमाचं, पण या गोष्टीवरुन सोनाली आणि या बड्या स्टारमध्ये निर्माण झाला जिव्हाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 17:31 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेमातही छाप पाडली आहे. मुक्ता, दोघी, कैरी, देवराई, रिंगा रिंगा, देऊळ, ...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेमातही छाप पाडली आहे. मुक्ता, दोघी, कैरी, देवराई, रिंगा रिंगा, देऊळ, डॉ.प्रकाश बाबा आमटे यासह विविध मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दिल चाहता हैं, सिंघम, टॅक्सी नं. ९२११, डरना जरुरी है यासह विविध हिंदी सिनेमातही तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच सोनाली हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यासह झळकणार आहे. सोनाली आणि नसिरसाहेब यांच्या या आगामी हिंदी सिनेमाचं नाव होप और हम असं आहे. नसिरसाहेबांच्या अभिनयाची सोनाली प्रचंड मोठी फॅन आहे. त्यामुळं या सिनेमात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभल्याने ती एक्साईटेड आहे. नसिरुद्दीन शाह यांना थिएटरची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच त्यांना रंगभूमीबद्द्ल विशेषतः मराठी रंगभूमी आणि कलाकारांबद्दल आदर आहे. याची कबुली त्यांनी वारंवार जाहिररित्या दिली आहे. याच कारणामुळे नसिरसाहेबांसोबत काम करण्यासाठी सोनाली एक्साईटेड होती. होप और हम या सिनेमाचं शुटिंग सुरु असताना मराठीवरुन दोघांमध्ये बरीच चर्चा झाली आणि वेगळे आपुलकीचे बंध निर्माण झाले. नसिरसाहेब हे अत्यंत प्रभावशाली अभिनेते असून त्यांच्यासोबत काम करणं हे भाग्य असल्याचे सोनालीने सांगितले. सिनेमाचं शुटिंग सुरु असताना प्रादेशिक सिनेमांची प्रगती याबाबत बरीच चर्चा झाल्याचे तिने सांगितले. मराठी सिनेमा प्रगल्भ होत असून आशयघन तसंच वैविध्यपूर्ण विषय हाताळले जात असल्याची चर्चा केल्याचं सोनालीने म्हटलं. अनेक उद्योन्मुख दिग्दर्शक प्रादेशिक सिनेमांमधून पुढे आल्याबाबत बोलणं झाल्याचंही सोनालीने सांगितले आहे. मराठी रंगभूमी आणि सिनेमा हाच या दोघांच्या चर्चेचा गाभा होता. मराठी सिनेमात कायमच कथेला कशारितीने महत्त्व दिलं गेलं यावरही या बड्या कलाकारांमध्ये चर्चा झाली. दुनियादारी, कोर्ट, सैराट, नटसम्राट या प्रत्येक सुपरहिट मराठी सिनेमात कथा हीच सिनेमाची ताकद कशी होती याबाबतही नसिरसाहेबांशी चर्चा झाल्याचे सोनालीने सांगितले आहे. त्यामुळे एका हिंदी सिनेमाच्या शुटिंगच्या सेटवर दोन दिग्गज कलाकारांमध्ये मराठीवरुन निर्माण झालेला हा खास जिव्हाळा नक्कीच आगळावेगळा म्हणावा लागेल. होप और हम हा हिंदी सिनेमा पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येईल.