Join us  

शितलीचे आई-वडील दिसणार 'ह्या' वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:55 PM

'मोरया प्रोडक्शन' आणि 'अंशुल प्रोडक्शन' निर्मित 'माहवारी' या वेबसीरिजचा आगामी भागदेखील कुस्तीपटूवर आधारीत आहे.

ठळक मुद्दे 'माहवारी'चा आगामी भाग कुस्तीपटूवर

सध्या संपूर्ण महाराष्ट्र कुस्तीमय झाला असून 'मोरया प्रोडक्शन' आणि 'अंशुल प्रोडक्शन' निर्मित 'माहवारी' या वेबसीरिजचा आगामी भागदेखील कुस्तीपटूवर आधारीत आहे. या भागात कुस्ती खेळताना मुलींना येणाऱ्या अडचणी व त्यावर त्या कशापद्धतीने मात करतात, हे पाहायला मिळणार आहे.  या भागात झी मराठी वरील 'लागीर झालं जी' या मालिकेमध्ये नाना-नानीची भूमिका करणारे शितलीचे आई-वडील देवेंद्र देव आणि दया एकसांबेकर पाहायला मिळणार आहेत. त्यांनी या भागाचे नुकतेच वाई जवळ मेणवलीमध्ये चित्रीकरण केले. 

या वेबसीरिजबद्दल देवेंद्र देव म्हणाले की,' जेव्हा माहवारी म्हणजे मासिक पाळी या विषयावरील एका कुस्तीपट्टूच्या वडीलांच्या भूमिकेविषयी मला विचारणा करण्यात आले तेव्हा लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल घडावा म्हणून या वेबसीरिजची निर्मिती केली जात आहे म्हणून मी लगेचच स्क्रिप्ट वाचून होकार कळवला आणि दुसरे एक कारण म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या कामाची पद्धत खूप उत्साही असून त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा असतो. तरुण रक्तासोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता आणि तो मला अनुभवायला मिळाला. खऱ्या आयुष्यात मी कुस्ती खेळणाऱ्या मुलाचा पिता आहे.'दया एकसांबेकर यांनी सांगितले की, स्त्रियांसाठी मासिक पाळी शाप नसून वरदान आहे हे पटवून देण्याचे काम 'माहवारी 'वेबसीरिजच्या माध्यमातून होत आहे आणि या वेबसीरिजमध्ये मला काम करायला मिळाले यासारखा दुसरा आनंद नाही. एका कुस्तीपटू मुलीच्या आईची भूमिका मी केली आहे. ही मुलगी तिच्या करियरसाठी खूप प्रामाणिक आहे. तिच्या करियरमध्ये पाळी अडसर ठरू शकत नाही हे तिच्या आईला पटवून देण्यासाठी ती आणि तिचे वडील प्रयत्न करतात. पण आईला त्यांचे म्हणणे पटते का? हे पाहण्यासाठी माहवारीचा आगामी भाग पाहावा लागेल.

 'माहवारी'चे दिग्दर्शन अश्विनी महांगडे आणि लेखन भाग्यशाली राऊत यांनी केले आहे. या वेबसीरिजचे छायाचित्रण मंगेश जगदाळे यांनी केले आहे.

श्वेता मानकुबरे, कुस्तीपटू

श्वेता मानकुबरे या कुस्तीपट्टू मुलीने यामध्ये काम केले आहे. ती या कला क्षेत्रातील नसूनही या मुलीने उत्तम अभिनय केला आहे.

टॅग्स :लागिरं झालं जी