Join us  

जल्लोषमय वातावरणात साजरा होणार रूपेरी पड्दयावर 'शिमगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:07 PM

'चॉकलेट बॉय'ची इमेज बाजूला ठेवून, भूषण प्रधान याने या चित्रपटात रांगडी भूमिका साकारली आहे. तर मानसी पंड्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित 'शिमगा' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. कोकणची शान असलेला आणि ज्या सणाची कोकणासह महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आवर्जून वाट पाहात असतो तो शिमगोत्सव या चित्रपटात अनुभवता येणार आहे. ट्रेलरमधून तरी या चित्रपटात कोकणातील शिमगोत्सवादरम्यान असलेले जोशमय वातावरण, गावागावात मानपानावरून होणारे वाद, अंतर्गत राजकारण पाहायला मिळणार आहे. 

याव्यतिरिक्त शिमग्याचे एक वेगळे रूपही प्रेक्षकांसमोर येणार आहे,  जे अद्याप गुलदस्त्यातच आहे. यापूर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मुळात चित्रपटाच्या कथानकात वैविध्यता असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल. एकमेकांबद्दल असलेले मनातील आकस, हेवेदावे अग्नीच्या ज्वाळांमध्ये जळून राख होऊन,नव्या सकारात्मक विचारांनी आयुष्याची सुरुवात व्हावी, यासाठी 'शिमगा' सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. आपल्यातील नकारात्मक वृत्तीचा नाश करून, प्रत्येक सण, उत्सव एक परंपरा म्हणून सर्वांनी मिळून एकत्र साजरा करावा, असा साधा, सरळ संदेश यातून देण्यात येत आहे. 

'चॉकलेट बॉय'ची इमेज बाजूला ठेवून, भूषण प्रधान याने या चित्रपटात रांगडी भूमिका साकारली आहे. तर मानसी पंड्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. याव्यतिरिक्त राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत, सुकन्या सुर्वे, विजय आंदळकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित, प्रस्तुत 'शिमगा' हा सिनेमा कोकणात शिमग्याचे जल्लोषमय वातावरण असतानाच म्हणजेच १५ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पंकज पडघण यांचे संगीत लाभलेल्या या सिनेमातील गाणी गुरु ठाकूर आणि वलय यांची आहेत तर नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानराजेश श्रृंगारपुरे