Join us  

‘शो मॅन’ राज कपूर यांचा भगवान दादांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 7:17 AM

हिंदी असो वा मराठी आपण सिनेसृष्टीत मैत्रीचे किस्से नेहमीच ऐकले आहेत. मात्र ज्यांनी एकत्र सिनेमे बनवले, एकाच डब्ब्यात जेवणाचा ...

हिंदी असो वा मराठी आपण सिनेसृष्टीत मैत्रीचे किस्से नेहमीच ऐकले आहेत. मात्र ज्यांनी एकत्र सिनेमे बनवले, एकाच डब्ब्यात जेवणाचा आस्वाद घेतला, एकमेकांना सिनेनिर्मितीसाठी योग्यवेळी योग्य तो सल्ला दिला, अशा दोन धुरंधरांच्या मैत्रीविषयी आपल्याला तितकेसे माहित नाही. आणि हेच दोन धुरंधर आहेत भगवान दादा आणि राज कपूर. फायटर, डान्सर अशा अनेक उपाध्या मिळवून आपल्या ऍक्शनपटांमध्ये धन्यता मानलेल्या भगवान दादांना सोशल सिनेमाकडे वळण्याचा सल्ला आपल्या इंडस्ट्रीचे शो मॅन राज कपूर यांनी दिला होता.

ऍक्शन पटांच्या दुनियेत रंगलेल्या भगवान दादांचे सिनेमे प्रेक्षकांना आवडत तर होतेच शिवाय तांत्रिक बाबी समजणाऱ्या सिनेनिर्माते, दिग्दर्शकांना ही भगवान दादांच्या अनोख्या शैलीचे अप्रूप होते. भगवान दादांची डान्सिंग स्टाइल, त्यांचे फाइट सिक्वेन्सेस राज कपूर यांना भुरळ घालायचे. हा सोशल सिनेमाचा मसाला भगवान दादा ऍक्शन पटांमध्ये का वापरतात? हा प्रश्न पडलेल्या राज कपूर यांनी भगवान दादांना ऍक्शन पटांकडून सोशल सिनेमाकडे वळण्याचा सल्ला दिला.

आपल्या मित्राचा हा प्रेमाचा सल्ला कसा टाळायचा यासाठी त्या सल्ल्याचा विचार झाल्यानंतर भगवान दादांनी ‘अलबेला’ सिनेमा बनवण्याचे ठरवले आणि या अफलातून सिनेमाची कथा लिहिली गेली. प्यारेची भूमिका भगवान दादाच साकारणार हे ठरले आणि या अलबेल्याच्या आशाचा शोध सुरू झाला. गीता बालीच्या रूपात ही आशा सिनेमात अवतरली आणि सिनेमा सुपरहिट ठरला. याच चित्रपटावर, चित्रपटाच्या निर्मितीकारावर सिनेमा येत आहे “एक अलबेला”

                             

अलबेला असो वा भगवान दादांचा इतर कोणताही सिनेमा या अवलियाचे आयुष्य खूप मनोरंजक होते. हाच मनोरंजन सोहळा आपण पुन्हा अनुभवणार आहोत ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या निमित्ताने.

मंगलमूर्ती फिल्मस् आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित आणि शेखर सरतांडेल दिग्दर्शित 'एक अलबेला'  येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.