Join us  

शरद पोंक्षे आणि पुष्कर श्रोत्री यांना पोलिसांकडून समज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 10:06 AM

 काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यामुळे चित्रपटसृष्टीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने ...

 काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यामुळे चित्रपटसृष्टीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने तर जोपर्यत पुण्यात यांचा पुतळा बसविण्यात येणार नाही, तोपर्यत येथे नाटकाचे प्रयोग करणार नसल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर त्याने सोशलमीडियावर एक पोस्ट अपलोड केली होती. तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटला होता,  ' मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही... मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माज्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही! राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय? मी ह्या घटनेचा निषेध करतो आणि जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यंत मी पुण्यात प्रयोग करणार नाही'      आता नुकतेच, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोक्षे या कलाकारांनी केला होता. मात्र या दोघांना डेक्कन पोलिसांनी समज दिली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही, असे स्पष्ट करत कार्यक्रम घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डेक्कन पोलिसांनी दिला आहे.           ३ जानेवारी रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवून नदीत फेकला होता. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी संभाजी उद्यानात एकत्र येण्याचे आवाहन पुष्कर श्रोत्री आणि शरद पोक्षेंनी केले होते.