शांतेचे कार्ट चालू आहे चालले डोहाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 11:13 IST
शांतेचे कार्ट चालू आहे हे नाटक ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजले होते. या नाटकाची पटकथा, नाटकातील विनोद प्रेक्षकांना प्रचंड भावले ...
शांतेचे कार्ट चालू आहे चालले डोहाला
शांतेचे कार्ट चालू आहे हे नाटक ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजले होते. या नाटकाची पटकथा, नाटकातील विनोद प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. पण त्याचसोबत या नाटकातील कलाकारांचा अभिनय तर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, नयन तारा, रुही बेर्डे, प्रकाश बुद्धीसागर, रविंद्र बेर्डे आणि सुधीर जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेला त्या काळात प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आज इतकी वर्षं झाली असली तर हे नाटक प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे. या नाटकाची लोकप्रियता पाहाता हे नाटक नव्या कलाकारांसोबत अनेक वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आले. सध्या या नाटकात प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार, सुनील तावडे, भाऊ कदम प्रमुख भूमिका साकारत आहेत. या नाटकालादेखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या नाटकातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केले जात आहे. या नाटकाने केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर या नाटकाचे दौरे केले आहेत आणि आता या नाटकाची टीम दोहामधील प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी रवाना झाली आहे. या नाटकाचे काही प्रयोग दोहामध्ये होणार असून या दौऱ्यासाठी या नाटकाची टीम नुकतीच रवाना झाली आहे. दोहामध्ये प्रयोग करण्यासाठी या नाटकाची टीम खूपच उत्सुक आहे. या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारे सुनील तावडे यांनी शांतेचे कार्ट चालू आहेचा प्रयोग आता दोहाला होणार असून त्यासाठी मी निघालो असल्याचे फेसबुकवर पोस्ट केले आहे आणि त्याचसोबत त्यांचा विमानातील सेल्फीदेखील पोस्ट केला आहे.