Join us  

सयाजी शिंदेंचा 'फास' पोहचला सातासमुद्रापार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 7:21 PM

‘फास’ मधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील तफावत अधोरेखित करण्यात आली असून शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळले गेले आहेत.

‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण १५ चित्रपटांची वर्णी लागली आणि महत्वाचे म्हणजे भारतीय चित्रपटांच्या उन्नतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या ‘विंग्स टू बॉलिवूड’ तर्फे त्यातील तब्बल १३ चित्रपट पाठविण्यात आले आहेत, ज्यात सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘फास’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे.  चित्रपटाच्या प्रीमियरवेळी ‘फास’चे ‘डायरेक्ट स्क्रीनिंग’ ‘कान’मधून होणार होते व त्या सोहळ्यासाठी ‘विंग्स टू  बॉलिवूड’ चे प्रमुख विक्रांत मोरे यांच्यातर्फे खास व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते. 

अविनाश कोलते दिग्दर्शित ‘फास’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये, आपल्या दमदार अभिनयाने विविध पुरस्कार पटकावणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच कमलेश सावंत याने पिचलेल्या आणि हताश शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. ‘फास’ मधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील तफावत अधोरेखित करण्यात आली असून शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळले गेले आहेत. दिग्दर्शक अविनाश कोलते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती आहे. लेखिका माहेश्वरी पाटील यांनी स्वानुभवावरून आणि वास्तविक घटनांवर आधारित कथानक लिहिले असून त्याचे हृदयद्रावक चित्रण झाले आहे. 

अभिनेते सयाजी शिंदे स्वतः शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास लगेचच होकार दिला होता. त्यांनी कळकळीची विनंती केली की शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. अभिनेते उपेंद्र लिमये म्हणाले, ‘मी नेहमीच आशयघन चित्रपटांना पसंती देतो तसेच पदर्पणीय दिग्दर्शकांसोबत काम करायला कचरत नाही. नवीन दिग्दर्शक नेहमीच पोटतिडकीने आपली कथा मांडत असतो जशी अविनाशने ‘फास’ मधून मंडळी आहे. मी नेहमीच सामाजिक व राजकीय विषयांवरील चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतो. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचला पाहिजे आणि समाजाला जाणिवेच्या पातळीवर आणून आपल्या अन्नदात्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’ 

शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय आहे आणि कोणते बदल घडायला पाहिजेत म्हणजे हा बुडत चाललेला शेतकरी कुठेतरी डोके वर काढू शकेल यावर ‘फास’ हा चित्रपट उहापोह करतो. 

टॅग्स :सयाजी शिंदेउपेंद्र लिमये