Join us  

मुंबई 'ग्रीन' करण्याचा सयाजी शिंदेंचा वसा, वृक्ष लागवडीची मोहीम हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 4:28 PM

निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ प्रजातींच्या वृक्ष आणि वेलींच्या संवर्धन व संगोपनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.प

सयाजी शिंदे यांनी आपल्या अभिनयानं मराठी मनाला मोहिनी घातली आहे. अभिनयाव्यतिरिक्त स्वतःला समाज कार्यातही त्यांनी  झोकून दिलं आहे. सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. वेगवेगळ्या गोष्टी सुचवत पर्यावरणाविषयी महत्त्व पटवून देतात.

 

निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई  व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ प्रजातींच्या वृक्ष आणि वेलींच्या संवर्धन व संगोपनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.पहिल्या पावसाच्या आगमनानंतर बोरीवलीतील नॅशनल पार्क येथे कृष्णवड, तेंदु, अजानवृक्ष, हुंब यासारख्या 22 दुर्मिळ देशी प्रजातींची लागवड, तसच हिरडा, बेहेडा, मुचकुंद अशा अनेक औषधी वनस्पती आणि वेलींयुक्त बोटोनिकल गार्डन आणि शाश्वत आठवणींचा वारसा जपण्याच्या हेतूने उभारण्यात येणारी वृक्षरुपी आँकसीजन बँक यांचा समावेश असणारे. आत्ता पर्यंत साधारण २२ देवराई , १ वृक्ष बँक , १४ गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान ४ लक्ष हून अधिक वृक्षारोपण करणाऱ्या ह्या संस्थेने आता मुंबई हिरवी करण्याचा जणू ध्यासच घेतलाय. 

खरंतर माणूस समाजाला देणं लागतो आणि याच भावनेतुन आपल्यालाही असं वाटत असतं कि आपणही वृक्षारोपणासारखं सामाजिक कार्य करावं. मात्र ब-याच लोकांच्या बाबतीत ही भावना फक्त त्या त्या जागतीक दिनीच उत्पन्न होते. तस न करता सह्याद्री देवराईने झाडांच्या संवर्धनाचं काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. आणि लोकांनीही या कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी या कार्यक्रमात अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलय. केवळ एका दिवसाच्या सहभागात आनंद न मानता आपल्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी वृक्षलागवड करून भविष्यासाठी शाश्वत आठवणी पेरून निसर्ग जपूया असे त्यांनी म्हटले आहे .

टॅग्स :सयाजी शिंदे