Join us  

सतीश कौशिक यांनी केली मराठी चित्रपटा निर्मिती, या तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:09 AM

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे.

आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर सतीश कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायेत. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना सतीश कौशिक सांगतात की संहिता व आशय या दोन गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं त्यातूनच ‘मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणली आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत. 

निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.